सावंतवाडी : माझ्यामुळे युती तुटल्याचा अप्रचार सध्या सावंतवाडीत सुरू आहे. मात्र, ही युती माझ्यामुळे तुटली नसून याची कल्पना भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वालाही आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर शतप्रतिशत भाजप नारा देणाऱ्यांनी कुडाळात काय झाले त्याचा विचार करावा, असा टोला गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी भाजपला लगावला. निवडणुकीत पैसे वाटणाऱ्यांविरोधात गृहखात्याचा वापर केला जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाला. यावेळी विद्यमान नगराध्यक्ष बबन साळगावकर, अॅड. सुभाष पणदूरकर, प्रचारप्रमुख राजन पोकळे, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, माजी नगराध्यक्षा अनारोजीन लोबो, शहरप्रमुख शब्बीर मणियार, बाबू कुडतरकर, संजय पेडणेकर, विलास जाधव, कीर्ती बोंद्रे, मुन्ना कोरगावकर, महिला आघाडीप्रमुख रश्मी माळवदे, सुरेंद्र बांदेकर, सुरेश भोगटे, प्रकाश परब आदी यावेळी उपस्थित होते.मंत्री केसरकर म्हणाले, सावंतवाडीत माझ्याबद्दल विरोधी पक्ष अप्रचार करीत आहे. मात्र, या अप्रचारात काही तथ्य नाही. युती तुटली त्याला मला जबाबदार धरले जाते. पण प्रत्यक्षात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना ही युती कोणामुळे तुटली याची माहिती आहे. जिल्ह्यात सावंतवाडी व वेंगुर्ले येथेच युती झाली नाही. शिवसेनेकडून सर्व सहकार्य भाजपला देण्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यांनीच प्रतिसाद दिला नसल्याचा खुलासा यावेळी मंत्री केसरकर यांनी केला. तसेच शतप्रतिशत भाजपचा नारा देता त्यावेळी कुडाळ येथे काय झाले याचाही भाजपने विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे आता युती झाली नसली तरी चांगल्या वातावरणात लढाई जिंकूया, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. आमच्याकडे कार्यकर्ते कमी असले तरी मतदार मोठे आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मला जेवढी मते पडली होती, तेवढीच मते नगराध्यक्षपदाचे उमेदवार बबन साळगावकर यांना पडली पाहिजेत. प्रत्येक कार्यकर्त्याने घराघरात जाऊन मतदारांना विश्वास द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मी माझा संपूर्ण वेळ हा सावंतवाडीकरांसाठी देणार असून, प्रत्यक्ष प्रचारातही सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीेच्या नगरसेवकांनी आपले स्वच्छ चारित्र्य व पारदर्शक व्यवहार कायम राखला. यावेळी ११ नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून, त्यांनी जुन्या सहा जणांकडून शिकून घ्यावे. नगरपालिकेत चांगला कारभार करा आणि शहराचे नाव उंचवा, असे मंत्री केसरकर यांनी सांगितले. उपनगराध्यक्ष राजन पोकळे म्हणाले, कोणी कितीही खालच्या पातळीवर येऊन प्रचार करू दे. आपण शांत वातावरणात प्रचार करून नगराध्यक्षांसह नगरसेवकांना जिंकून आणूया. शहरात केलेल्या विकासकामांमुळे जनतेचे आपल्यावर प्रेम असून, ते प्रेम या निवडणुकीतही दिसून येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रकाश परब, शब्बीर मणियार आदींनी विचार मांडले. केसरकर यांच्या हस्ते सुंदरवाडीचा सर्वांगीण विकास या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी समीरा खलील, दीपाली सावंत, देवेंद्र टेमकर, समता सूर्याजी, नगरसेविका साक्षी कुडतरकर, महेंद्र पटेकर, भारती मोरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)जिल्ह्यात बदनाम झालेले सावंतवाडीतसावंतवाडीत सध्या फूट पाडण्याचे काम सुरू आहे. काही जिल्ह्यातील नेते येऊन आमच्यात फूट पाडत आहेत. त्यांनी आपल्या मतदार संघात लक्ष घालावा, असे सांगत बदनाम पुढाऱ्यांमुळे जिल्ह्याचे नाव खराब झाले आहे. त्यांना सावंतवाडीत थारा देऊ नका. अन्यथा, ते सावंतवाडीत फूट पाडतील, असेही त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी गेल्या पाच वर्षांत शहरात केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. यापुढे असाच विकास करणार असून, मोठ्या प्रमाणात निधी शहराचा कायापालट करणार असल्याचेही बबन साळगावकर यांनी सांगितले.
शतप्रतिशत भाजप मग कुडाळात काय झाले?
By admin | Published: November 15, 2016 12:15 AM