सावंतवाडी : राज्यातील १०८ रुग्णवाहिका चालक संपावर जाणार आहेत. याबाबत संघटनेने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले होते. मात्र, यावर अद्याप तोडगा न निघाल्याने बेमुदत संप पुकारला आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्यसेवा व रूग्णांची परिस्थिती पाहता सिंधुदुर्ग १०८ च्या चालकांनी मात्र या संपात सहभागी होण्याबाबत असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग लाईफ लाईन ऐन संप कालावधीत ही सुरळीत असणार आहे.महाराष्ट्र राज्यात आपत्कालीन मोफत वैद्यकीय आरोग्य सेवा १०८ ही २०१४ पासून सुरु करण्यात आली आहे. ही रुग्णवाहिका चालवणारे चालक हे २०१४ सालापासून अत्यंत कमी पगारात काम करत आहेत. याबाबत संघटनेने आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले होते. मात्र, या विषयावर अद्याप तोडगा न निघाल्याने चालकांनी १ सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०८ चालक या संपात सहभागी होणार नसून रूग्णसेवा देणार असल्याची ग्वाही दिली आहे. त्याबाबतच पत्रही दिले आहे अशी माहिती १०८ चे डिस्ट्रिक्ट मॅनेजर विनायक पाटील यांनी दिली. यावेळी साईसिद्देश मेस्त्री, रामचंद्र देसाई, अवधूत परूळेकर आदी उपस्थित होते.
राज्यातील १०८ रुग्णवाहिका चालक संपावर जाणार, मात्र सिंधुदुर्गातील लाईफलाईन सुरळीत राहणार
By अनंत खं.जाधव | Updated: August 29, 2023 17:11 IST