मंडणगड : रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहचता यावे, यासाठी शासनाच्यावतीने राबविण्यात आलेली १०८ रुग्णवाहिका सेवा रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरत आहे. मात्र, मंडणगड तालुक्यात विविध कारणांनी ही रुग्णवाहिका सेवा अडचणीची ठरत आहे. सध्या गाडीचे हेडलाईट नसल्याने रात्रीच्यावेळी ही रूग्णवाहिका बंद ठेवण्यात येत आहे.गेले महिनाभर रुग्णवाहिकेसाठी आवश्यक असणारा वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने ही सेवा ठप्प आहे. सध्या दिवसभरासाठी एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, रात्री एखादा अपघात अथवा आपत्कालीन प्रसंग उद्भवल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी रुग्णवाहिका असून नसल्यासारखीच आहे. दीड महिन्यापूर्वी रुग्णवाहिकेला माणगाव येथे अपघात झाला होता. या अपघातात गाडीचा एक टायर फुटला, गाडीचे बुशींग, पाटे व हेडलाईट नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी लांबच्या प्रवासासाठी रुग्णवाहिकेचा वापर करण्यात येत नाही. याबाबत मंडणगड रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार गाडीच्या देखभाल दुरूस्तीचे काम करणाऱ्या भारत विकास ग्रुपकडून दुरुस्तीचे कामात दिरंगाई झाल्याने रुग्णवाहिकेचे कामकाज सध्या ठप्प आहे. सध्या ही गाडी रूग्णालयातच आहे. या सेवेची गरज लक्षात घेता पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी व दुरूस्तीचे काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे़ (प्रतिनिधी)आपत्कालीन सेवा : रूग्णवाहिकेचे काम बंदआपत्कालीन काळात तातडीने रूग्णांना उपचार मिळावेत, यासाठी १०८ ही रूग्णवाहिका कार्यरत आहे. सर्व सोयींनी युक्त असलेली ही रूग्णवाहिका रूग्णांच्या सेवेसाठी तप्तर असते. मात्र, मंडणगडात या रूग्णवाहिकेचे काम थांबल्याचे दिसत आहे.रूग्णवाहिका कशासाठी?रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील अपघातात या रूग्णवाहिकेचे नुकसान झाले. त्यानंतर अद्यापही या रूग्णवाहिकेची दुरूस्ती झालेली नाही.
१०८ सेवा रात्रीच्यावेळी ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2016 12:04 AM