बांदा : पडवे-माजगाव (मधलीवाडी) येथील रेश्मा रमेश राऊत (वय ६०) या महिलेचा गोवा-बांबोळी येथे माकडतापाने उपचारादरम्यान गुरुवारी सायंकाळी उशिरा मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी त्यांना बांबोळी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. फेब्रुवारी महिन्यात त्यांना माकडतापाची लागण झाली होती, अशी माहिती दोडामार्ग तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार चिपळूणकर यांनी दिली. सावंतवाडी तालुक्यातील हा माकडतापाचा दहावा बळी आहे.फेब्रुवारी महिन्यात रेश्मा राऊत यांना ताप येऊ लागल्याने त्यांना तळकट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व तेथून सावंतवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचा रक्त तपासणी अहवाल ा माकडताप पॉझिटिव्ह आल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी गोवा-बांबोळी येथे पाठविण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचार घेतल्यानंतर त्या पूर्णपणे बऱ्या झाल्याने घरी परतल्या होत्या. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी त्यांना अचानक पुन्हा ताप येऊ लागला. त्यांची तपासणी केली असता हा ताप टायफॉईड असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने पुढील उपचारांसाठी गोवा-बांबोळी येथे पाठविण्यात आले. मात्र, गुरुवारी सायंकाळी ६.१५ च्या सुमारास त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पचात मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार आहे.याबाबत डॉ. तुषार चिपळूणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राऊत यांना फेब्रुवारीत माकडतापाची लागण झाल्याचे सांगितले. त्यांच्यावर तळकट व सावंतवाडी येथे उपचार करून पुढील उपचारांसाठी गोव्यात पाठविण्यात आले होते. तेथून त्या बऱ्या होऊन परत आल्या होत्या. दरम्यान, त्यांना दोन दिवसांपूर्वी टायफॉईड झाल्याने सावंतवाडी येथे व तेथून बांबोळी येथे पाठविण्यात आले होते. त्यांच्या रक्तातील प्लेटलेट्स कमी होत होत्या. त्यांचा मृत्यू माकडतापाने झाला किंवा नाही हे अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. मात्र, त्यांना सर्वप्रथम माकडतापाची लागण झाली होती, असे डॉ. तुषार चिपळूणकर यांनी सांगितले. सध्या तळकट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात माकडतापाचे सात पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे त्यांनी सांगितले.आतापर्यंत माकडतापाने बांदा परिसरात नऊजणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सटमटवाडी येथे या तापाचा जोर अद्याप कायम असून, बांदा परिसरातील गावांमध्येही या साथीचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. परिसरात मृत माकडे मिळण्याचे प्रमाणदेखील दिवसेंदिवस वाढत आहे. (प्रतिनिधी)
माकडतापाचा दहावा बळी
By admin | Published: April 28, 2017 11:51 PM