कणकवली : उषा शिलाई संस्था यांच्या माध्यमातून व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पुढाकारातून जिल्ह्यात १२० उषा शिलाई स्कूल सुरू करण्यात येणार आहेत. याचे लवकरच लोकार्पण होणार आहे, अशी माहिती आमदार नीतेश राणे यांनी दिली आहे.याबाबत पत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्यातील महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्यात तसेच व्यवसायात त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण करावे या उद्देशाने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने हा एक छोटासा प्रयत्न करण्यात येत आहे.गेल्याच आठवड्यामध्ये उषा शिलाई स्कूलचे संबंधित अधिकारी सिंधुदुर्गात येऊन माहिती आणि नियोजन करून गेले आहेत. त्या संबंधीचा नियोजित कार्यक्रम लवकरच जिल्ह्यातील महिलांसाठी आम्ही जाहीर करू.
प्रत्येक तालुक्यातून १५ महिला निवडण्याचे अधिकार महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, प्रणाली पाताडे आणि आठही महिला तालुकाध्यक्षा यांना दिले आहेत. ही १२० उषा शिलाई स्कूल आम्ही प्राथमिक स्वरुपामध्ये सुरू करीत आहोत. महिलांचा प्रतिसाद पाहिल्यानंतर अजून शिलाई स्कूल सुरू करण्याचा आमचा मानस आहे. हा कार्यक्रम पूर्णपणे नि:शुल्क असेल.नोंदणीसाठी महिलेला शिलाईचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच ती महिला विवाहित असणे आवश्यक आहे. तिचे आधारकार्डही गरजेचे आहे. विधवा आणि परित्यक्ता महिलांना प्राधान्य दिले जाईल.
प्रशिक्षणानंतर प्रत्येक महिलेला उषा शिलाई स्कूलचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शिलाई स्कूलच्या सुरुवातीच्या कार्यक्रमांच्या तारखा व पुढील नियोजन लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही नीतेश राणे यांनी या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.