सिंधुदुर्ग : वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी-हुलमेकवाडी समुद्रकिनारी संरक्षित केलेल्या ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या १२१ पिल्लांची सिंधुदुर्गात या हंगामातील पहिलीच बॅच गुरुवारी घरट्यातून बाहेर आली. या सर्व पिल्लांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या व स्थानिकांच्या उपस्थितीत नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले दुर्मीळ कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली असल्याने ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांना पाहण्याची पर्यटकांना पर्वणी असणार आहे.तालुक्यातील वायंगणी-हुलमेकवाडी सुरक्षित समुद्र किनाऱ्यावर समुद्री कासव प्रजनन काळात अंडी लावण्यासाठी किनाऱ्यावर येतात. अंडी वाळूत लावून जातात. ही अंडी कासवमित्र सुरक्षित ठिकाणी संरक्षित करून सभोवताली कुंपण करून समुद्राच्या पाण्यापासून तसेच कुत्रे, घार, कावळे, खेकडे यांसारख्या हिंस्र प्राण्यांपासून ४५ ते ५५ दिवसापर्यंत संरक्षण करतात. अड्ड्यातून बाहेर पडलेल्या पिल्लांना वनविभागाच्या सहकार्याने नैसर्गिक अधिवासात समुद्रात सोडून या दुर्मीळ कासवांना जीवदान देतात.वायंगणी-हुलमेकवाडी समुद्रकिनारी येथील कासव मित्र सुहास तोरसकर यांनी संरक्षित केलेल्या घरट्यामधून गुरुवारी सकाळी १२१ पिल्ले बाहेर आली. यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, सहायक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली व कुडाळ वनक्षेत्रपाल संदीप कुंभार, मठ वनपाल सावळा कांबळे, मठ वनरक्षक सावंत, भालचंद्र तोरसकर, घनश्याम तोरसकर तसेच ऑलिव्ह रिडले संस्थेचे सहकारी यांच्या उपस्थितीत या सर्व पिल्लांना सुखरूप समुद्राच्या पाण्यात सोडून जीवदान देण्यात आले.
काही दिवसात पर्यटकांसाठी मोठी पर्वणीशांत व निसर्गरम्य या समुद्रकिनारी कासव अंड्यांचे संवर्धन केले जात असल्याने. येत्या काही दिवसातच किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांना पाहण्याची पर्यटकांना मोठी पर्वणी असणार आहे. तर समुद्रकिनारी भागातील स्थानिकांनी या ऑलिव्ह रिडले जातीच्या समुद्री कासवांच्या संरक्षण आणि संवर्धन कार्यात वनविभागास सहकार्य करण्याचे आवाहन वनविभागामार्फत करण्यात येत आहे.