गुरुप्रसाद मांजरेकर -- मिठबांवं --कोकणातील गणेशोत्सव हा सर्व सणांचा शिरोबिंदू आहे. आजही जिल्ह्यात एकत्रितरित्या साजरे होणारे अनेक घरगुती गणपती आहेत. देवगड तालुक्यातील मिठबांव येथील जेठे घराण्याच्या गणपतीची स्थापना जेठे कुलस्वामिनी मंदिरात केली जाते. एकंदर २६ जेठे कुटुंबियांचा मिळून एकच गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. साधारणत: पाचशे वर्षांपूर्वी या गणेशोत्सवास प्रारंभ झाल्याचे सांगण्यात येते.पूर्वी या गणपतीच्या मूर्तीची निर्मिती गणपती प्रतिष्ठापनेच्या जागी ठोकळा पद्धतीने म्हणजेच साधारणत: सर्व आकार चौकोनी ठोकळ्यासारखे अशी असे. काळाच्या ओघात त्याचे स्वरुप बदलून ती मूर्ती पाकळ्यांच्या स्वरूपात बदलत गेली. संपूर्ण मूर्ती ही शाडू मातीपासून बनविली जाते. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे गणेश शिरावरील मुकुट १२१ पाकळ्यांचा असतो. म्हणूनच हा गणपती पाकळ्यांचा गणपती म्हणून ओळखला जातो. संपूर्ण हाताने बनविली जाणारी ही मूर्ती पांढऱ्या व शेंदरी रंगात बनविली जाते. दररोज दुपारी ढोलताशांच्या गजरात २६ घरांमधून आलेला नैवेद्य दाखविणे, ग्रंथवाचन करणे, सकाळ संध्याकाळ नौबत केली जाते. रात्री सुश्राव्य भजन होते. जेठे कुटुंबीयांच्या नऊ पिढ्यांचा इतिहास जपणारा हा गणपती सर्व जेठे कुटुंबीयांवर कृपादृष्टी ठेवून आहे. माळगाव-हुमरोसवाडीतील सार्वजनिक गणेशमालवण तालुक्यातील माळगाव हुमरोसवाडीतील परब कुटुंबियांचा सार्वजनिक गणपती गेली वर्षानुवर्षे साजरा केला जात आहे. या हुमरोसवाडीचे दोन भाग आहेत. एक वरचीवाडी आणि दुसरी खालचीवाडी. यातील वरच्यावाडीतील सर्व परब कुटुंबियांचा एकत्रित गणपती असतो. त्याठिकाणी ११ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम केले जातात. यात सत्यनारायणाची महापूजा, भजनांच्या कार्यक्रमांचे आकर्षण असते. त्यामुळे गेली शेकडो वर्षे हा उत्सव तेवढ्याच भक्तीभावाने साजरा होत आहे.प्रमुख घराण्यांचे एकत्रित गणपतीघरगुती गणेशोत्सव साजरा करणारी जिल्ह्यात अनेक कुटुंबे आहेत. प्रत्येक गावात एक तर गणेशोत्सव हा सार्वत्रिकरित्या साजरा होतो. विविध समाजाचे लोक एकत्र येत काही ठिकाणी सार्वजनिक गणेशाची प्रतिष्ठापना करतात. तर काही ठिकाणी गावातील वाडींमधील प्रमुख घराण्यांचे गणपती हे वर्षानुवर्षे सुरू असलेल्या परंपरेनुसार साजरे होताना दिसतात.
१२१ ‘पाकळ्यांचा’ गणपती
By admin | Published: September 11, 2016 12:39 AM