देवगड : विजयदुर्ग किल्ल्यासमोर समुद्रात पाच ते सहा वावांमध्ये प्रतिबंधित जलधी क्षेत्रात मासेमारी करताना देवगड, विजयदुर्ग पोलिसांनी तसेच सागरी पोलीस विभागाच्या पोलिस कर्मचा-यांनी संयुक्तपणे कारवाई मोहीम राबवून 13 पर्ससीन नौकांना पकडले. ही कारवाई रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास केली. प्रतिबंधित जलधी क्षेत्रात अनधिकृतपणे मच्छीमारी करताना 13 पर्सनेट नौकांना पोलिसांनी पकडण्याची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई असून पोलिसांनी 13 पर्सनेट नौकांपैकी 10 नौका व 12 नौकांवरील तांडेल यांना विजयदुर्ग बंदरात आणले असून तीन नौकांना रात्री उशिरापर्यंत आणण्याची कारवाई सुरू होती. पकडलेल्या नौकांवर 261 कर्मचारी होते.विजयदुर्ग किल्ल्यासमोर रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पाच ते सहा वावामध्ये प्रतिबंधीत जलधी क्षेत्रात अनधिकृतपणे मच्छिमारी करीत असलेल्या पर्ससीन नौका स्वाभिमानचे युवक तालुकाध्यक्ष उत्तम बिर्जे व विजयदुर्ग येथील स्थानिक मच्छिमारांच्या निदर्शनास आल्या.उत्तम बिर्जे आणि स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते यांनी ही बाब विजयदुर्ग पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली व मच्छिमारी करणा-या पर्ससीन नौकांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानुसार पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी देवगड येथील सागरी पोलीस दलाचे पोलिस उपनिरिक्षक जितेंद्र साळुंखे तसेच पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर शिवगण यांच्याशी संपर्क साधून पर्ससीन नौका पकडण्याची मोंहीम हाती घेतली.देवगड येथील स्पीड बोटींच्या सहाय्याने पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर शिवगण, पोलीस उपनिरिक्षक नेवसे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पाटील, कोयंडे, मनोज साळवी तसेच स्वाभिमानचे उत्तम बिर्जे व त्यांचे सहकारी यांच्यासमवेत पर्ससीन नौका मच्छिमारी करीत असलेल्या ठिकाणी कारवाई केली.यावेळी रत्नागिरी व मालवण येथील प्रत्येकी एक नौका व राजापूर नाटे येथील 11 नौका प्रतिबंधित जलधी क्षेत्रात अनधिकृतपणे मच्छिमारी करताना आढळल्या. नौकांवर कित्येक टन मासळी असल्याचा अंदाज व्यक्त होत असून त्यातील तीन नौका तेथेच अडकल्यामुळे उर्वरीत दहा नौकांना विजयदुर्ग बंदरात कारवाईसाठी आणण्यात आले. बंदरात येत असतानाच काही नौकांनी दंडात्मक कारवाई कमी होण्यासाठी नौकेवरील मासळी समुद्र्रात फेकली.विजयदुर्ग बंदरामध्ये आणण्यात आलेल्या 12 नौकांमध्ये नौका महम्मद कासीफ अब्दुल्ला (नौकामालक जुबेर पंगेरकर, नाटे) कर्मचारी 18, अब्दुल हमीद (नौकामालक सिकंदर अब्दुल हमीद गोवलकर, नाटे) कर्मचारी 17, के.अब्दुल्ला(नौकामालक हनिफ कोतवडकर, नाटे) कर्मचारी 22, अल हसन(नौकामालक आदिल म्हसकर, नाटे) कर्मचारी 20, अल साकिब(नौकामालक दानीश हुना, नाटे) कर्मचारी 25, अल इब्राहीम(नौकामालक जहूर बोरकर, नाटे) कर्मचारी 25, एच अब्बास(नौकामालक मूनाब होडेकर, रत्नागिरी) कर्मचारी 26, महम्मद सैफ(नौकामालक सैजाद कोतडकर, नाटे) कर्मचारी 17, हिमालिया (नौकामालक हाजीमिया हुन्ना, नाटे) कर्मचारी 22 जुनेद फैजान (नौकामालक इश्राफ भाटकर, नाटे) कर्मचारी 25, मोरयाराज (नौकामालक संतोष काशीनाथ चव्हाण, नाटे) कर्मचारी 26 व विक्रांत (नौकामालक गोपीनाथ भगवान तांडेल, मालवण) कर्मचारी 19 या नौकांचा समावेश आहे. यातील तीन नौका काही कारणास्तव मच्छिमारी करीत असलेल्या ठिकाणीच अडकल्यामुळे त्यांना रात्री उशिरापर्यंत विजयदुर्ग बंदरामध्ये आणण्याची प्रक्रिया सुरू होती.विजयदुर्ग येथे प्रतिबंधित जलधी क्षेत्रात अनधिकृतपणे मच्छिमारी करताना निदर्शनास आलेल्या नौकांबाबतची माहिती स्वाभिामन पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष उत्तम बिर्जे यांनी आमदार नितेश राणे यांना दिल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिस अधिक्षकांशी संपर्क साधून त्या नौकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.जिल्ह्यातील मोठी मोहीमविजयदुर्ग समुद्रात किल्ल्यासमोर पाच ते सहा वावामध्ये अनधिकृतपणे पर्ससीन नौका मच्छिमारी करीत असून रविवारी मच्छिमारी करताना नाटे येथील 11, रत्नागिरी येथील 1 व मालवण येथील 1 अशा एकूण 13 नौकांना पोलीस यंत्रणेमार्फत पकडण्याची कारवाई केली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच एवढी मोठी कारवाई केली आहे. संबंधित नौकांवर मोठ्या प्रमाणात मासळी असून नौका पुढील कारवाईसाठी मत्स्यव्यवसाय विभागाच्या ताब्यात देवून त्यानंतर मासळीच्या लिलावाची प्रक्रिया होणार आहे. विजयदुर्ग समुद्रात अनधिकृत मासेमारी करताना देवगड, विजयदुर्ग पोलिसांनी तसेच सागरी पोलीस विभागाच्या पोलीस कर्मचा-यांनी संयुक्तपणे कारवाई मोहीम राबवून 13 पर्ससीन नौका पकडल्या.
अनधिकृत मच्छीमारी करणा-या 13 पर्ससीन नौका पकडल्या, विजयदुर्ग समुद्रात कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2017 9:03 PM