सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्हा परिषद ९० टक्के अनुदानावर बुधवारी १३ दुग्ध उत्पादक सहकारी संस्थांना प्रत्येकी एक याप्रमाणे फॅट मशीनचे वाटप करण्यात आले. फॅट मशीनचे वाटप जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. एका फॅट मशीनची किंमत ४० हजार १०० रुपये एवढी असून, यापैकी लाभार्थी हिस्सा ४ हजार १० रुपये (दहा टक्के) एवढा आहे.जिल्ह्यात ७० दुग्ध उत्पादक सहकारी संस्था नोंदणीकृत आहेत. यापूर्वी ५७ सहकारी संस्थांना फॅट मशीनचा पुरवठा करण्यात आला आहे. यापैकी गेल्या वर्षी फॅट मशीनसाठी ४६ प्रस्ताव प्राप्त झाले होते. यापैकी ४२ प्रस्तावांना मान्यता देत फॅट मशीन संबंधित संस्थाना वाटप केले. त्यावेळी मशीनची किंमत ४५ हजार एवढी होती. त्यावेळीही ९० टक्के अनुदानावर वाटप करण्यात आले होते.गुरुवारी उर्वरित १३ दुग्ध उत्पादक सहकारी संस्थांना फॅट मशीनचे वाटप जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगांवकर यांच्या हस्ते त्यांच्याच दालनात करण्यात आले. यावेळी संत राऊळ महाराज दुग्ध उत्पादक संस्था पिंगुळी, लोरे नं. १ मधील गांगेश्वर दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्था, हरकुळ खुर्द येथील अमृत दुग्ध सहकारी संस्था, आरवली येथील स्वामी छाया दुग्ध संस्था, आडेली येथील कामधेनू सहकारी दुग्ध व्यावसायिक संस्था, तळवडे येथील बामणादेवी दूध उत्पादक संस्था, बांदा येथील बांदेश्वर दुग्ध उत्पादन व प्रक्रिया सहकारी संस्था, आंबोली येथील नांगरतास दुग्ध उत्पादक सहकारी संस्था, कोलझर येथील श्रीदेवी माऊली प्रसाद दुग्ध व्यावसायिक संस्था, मसुरे येथील पावणाई देवी महिला दुग्ध उत्पादक संस्था, मठबुद्रुक येथील श्रीकृष्ण गोपाळ दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्था, चिंदर येथील गुरुकृपा दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्था, खांंबाळे येथील दुग्ध सहकारी संस्था या १३ सहकारी संस्थांना फॅट मशीनचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, वित्त व बांधकाम सभापती दिलीप रावराणे, जिल्हा परिषद सदस्य संदेश सावंत, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सत्यनारायण चंदेल, पशुधन विकास अधिकारी विद्यानंद देसाई, आदी उपस्थित होते.यावेळी पशुसंवर्धन अधिकारी डॉ. चंदेल म्हणाले की, दुधाची प्रतवारी समजून दुधातील फॅट आणि एस. एन. एफची अचूक माहिती संकलित करून दुधाचा दर निश्चित करता येईल. शुद्ध व निर्भेळ दूध उपलब्ध होईल व शेतकऱ्यांना फायदा होईल, आरोग्यास अपाय टाळता येईल. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील १३ दुग्ध संस्थांना मिळाले फॅट मशीन
By admin | Published: April 21, 2016 9:05 PM