सावंतवाडी : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत गावातील रस्त्यांसाठी १३०० कोटी रूपयांचा निधी जिल्ह्याला मिळणार असून, जिल्ह्याच्या पर्यटनदृष्ट्या विकास व वाढीसाठी नवीन रस्ते गावागावात तयार होणार आहेत. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांवर होत असलेली पोलिसांची अरेरावीवर नियंत्रण आणण्यसाठी तत्काळ लक्ष देण्याचे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंंदे यांना दिले. ‘सिंधुदुर्ग जिल्हा एक पाऊल वचनपूर्तीचे’ हा वार्तालाप कार्यक्रम जिल्हा माहिती कार्यक्रमांतर्गत येथील पर्णकुटी विश्रामगृहावर आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी पालकमंत्री दीपक केसरकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, नगराध्यक्ष बबन साळगावकर, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, माजी आमदार पुष्पसेन सावंत, तहसीलदार सतीश कदम आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारला एक वर्ष पूर्ण होत आले. शासनाने गेल्या वर्षभरात केलेल्या कामकाजाचा यावेळी आढावा घेतला. यावेळी पर्यटन विकासवाढीबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या पर्यटकांना पोलिसांच्या अरेरावीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली आहे. याबाबत पालकमंत्री केसरकर यांनी आंबोली घाटात तीन-चार ठिकाणी होणाऱ्या तपासण्या रद्द करून एकाच ठिकाणी तपासणी करण्याचे आदेश दिले. तर एकाचवेळी तपासणी झाल्यावर त्यांना तपासणी पावती देण्याबाबत प्रयत्न करणार आहे. यामुळे तीन तपासणी पावती अन्य तपासणी नाक्यांवर दाखविल्यास अनेकवेळा तपासणी करण्याची गरज भासणार नाही, असे केसरकर म्हणाले. यामध्ये सुधारणा झाली नाही तर राज्यपातळीवर तक्रार करणार असल्याचे केसरकर म्हणाले. येथील उपजिल्हा रूग्णालयातही डायलेसीस सेंटरच्या अपुऱ्या सुविधांमुळे जिल्हा रूग्णालयात असणारी स्वेअर मशिन सावंतवाडीत आणण्यात येणार आहे. राजीव गांधी योजनेंतर्गत मणिपाल हॉस्पिटल, केर्इंली बेळगाव व गोवा येथील मेडिकल हॉस्पिटल आदी सर्व रूग्णालयांमध्ये नोंदणी लवकरच करण्यात येणार असल्याचे यावेळी केसरकर म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी ५०० कोेटीच्यांवर निधी आल्याचे केसरकर यांनी सांगितले. तसेच ग्रामविकासच्या माध्यमातून येणाऱ्या कोट्यवधींच्या निधीची माहिती दीपक केसरकर यांनी यावेळी दिली. (वार्ताहर)
आगामी वर्षात १३०० कोटींचा निधी मिळणार
By admin | Published: November 25, 2015 11:27 PM