सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गात पहिलीच्या वर्गात ५७४० विद्यार्थ्यांनी प्रवेश केला असून गतवर्षीच्या तुलनेत १३६८ विद्यार्थ्यांची घट झाली आहे. गतवर्षीच्या पहिलीच्या वर्गात ७१०८ विद्यार्थ्यांनी प्रवेश केला होता. दरवर्षी हजारोंच्या पटसंख्येत घसरत जाणारी पटसंख्या ही जिल्ह्याच्या दृष्टीने चिंताजनक बाब असून पटसंख्येअभावी शाळांना टाळे लागल्याचे प्रकारही सुरू झाले आहेत. अशा स्थितीत जिल्ह्यातील खासगी व सरकारी शाळांमध्ये पटसंख्या टिकवून ठेवण्याचे आव्हान उभे राहिले आहे १५ जूनपासून शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असून ५७४० विद्यार्थ्यांनी पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला आहे. ही पटसंख्येची आकडेवारी खासगी व सरकारी शाळांमधील आहे. यात ६ ते १४ वयोगटातील २६५० मुली व २८२१ मुलगे असे मिळून ५४७१, तर ५ ते ६ वयोगटातील १५० मुलगे व ११९ मुली असे मिळून २६९ असे एकूण ५७४० विद्यार्थी आहेत. सर्व शिक्षा अभियान पटनोंदणी सर्वेक्षण २०१६-१७ साठी करण्यात आले. एकूण ८१ हजार ८१ मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ४२ हजार ५६ मुलगे व ३९ हजार २५ मुलींचा समावेश होता. यातील सर्वेक्षणावेळी ६८ हजार १९ मुले शाळेत दाखल झाली होती, तर १३ हजार ६२ मुलांमध्ये २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात पहिलीमध्ये दाखल होऊ शकतील अशी ११ हजार ३८९ मुले होती. त्यातील ३८३६ एवढी मुले दाखल झाली होती, तर ७५५३ मुले दाखल झाली नव्हती. त्यामुळे यातील किती मुले दाखल झाली होती याबाबत उत्सुकता होती. या सर्वेक्षणात ५ ते ६ वयोगटातील ८४३४ मुले, तर ६ ते १४ वयोगटातील ५५५७ मुले आढळले होते. १५ जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी ५ ते ६ वयोगटातील २६९ मुलांनी पहिलीत प्रवेश घेतला. ६ ते १४ वयोगटातील ५४७१ मुलांनी पहिलीत प्रवेश घेतला. यात २६५० मुली व २८२१ मुलगे असा समावेश आहे. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत १३६८ संख्येने घट झाली आहे. (प्रतिनिधी)पटसंख्या टिकविण्याचे मोठे आव्हानपहिलीच्या वर्गात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता वर्षानुवर्षे यात घट होतानाच दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या वर्षानुवर्षे अबाधित ठेवण्याचे जिल्हा परिषद शाळा व खासगी शाळा समोर आव्हान उभे राहिले आहे. गतवर्षीच्या पटसंख्येअभावी जिल्हा परिषदेने तब्बल दोन शाळांना टाळे ठोकले होते.
१३६८ विद्यार्थ्यांची घट
By admin | Published: June 17, 2016 10:04 PM