मालवण : महसूल प्रशासनाच्या कारवाई विरोधात कालावल खाडी किनारी कायदेभंग आंदोलन करून सरकारी कामात अडथळे, पर्यावरणाचा ऱ्हास करून बंदी असताना वाळू चोरी तसेच शिवीगाळ, दमदाटी, धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आमदार वैभव नाईक यांच्यासह अन्य १४ संशयितांनी मंगळवारी मालवण पोलिसांत शरणागती पत्करली. पोलिसांनी अटक केल्यानंतर दुपारी मालवण न्यायालयात हजर केले असताना न्यायाधीश संतोष चव्हाण यांनी आमदारांसह १४ संशयितांना १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर मुक्त केले.दरम्यान, कायदेभंग आंदोलनाला एक वर्ष उलटले तरी गुन्हा दाखल असलेल्या आमदार नाईक यांच्यावर पोलिसांनी कारवाई न केल्याने आमदार नीतेश राणे यांनी विधानसभेत आवाज उठविला होता. त्यानुसार पोलिस प्रशासनाने नाईक व अन्य संशयितांना अटक करण्याची तयारी केली होती. मंगळवारी दुपारी आमदार नाईक व अन्य १४ संशयितांनी मालवण पोलिस ठाण्यात शरणागती पत्करली. पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महादेव जाधव, डॉ. सागर वाघ, मारुती जगताप, नितीन केराम यांनी अटकेची प्रक्रिया करून दुपारी मालवण न्यायालयात हजर केले. महसूल प्रशासनाच्या अन्यायकारक कारवाई व दंड वसुलीबाबत आमदार वैभव नाईक व सहकाऱ्यांनी प्रशासनाला इशारा देत २९ एप्रिल २०१५ रोजी मालवण कालावल खाडी किनाऱ्यावर कायदेभंग आंदोलन छेडले होते. त्यानंतर मालवणच्या तहसीलदार वनिता पाटील यांनी मालवण पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. (प्रतिनिधी)जनतेच्या अन्यायाला वाचा फोडणारचसंशयितांच्या वतीने अॅड. उल्हास कुलकर्णी यांनी काम पाहताना अनेक युक्तिवाद मांडले. तब्बल तीन तासानंतर सशर्त जामिनावर मुक्ततेचे न्यायाधीशांनी आदेश दिले. वाळू आंदोलन हे जनआंदोलन होते. जनतेच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण आंदोलन केले होते. ओरोस येथे झालेल्या डंपर आंदोलनातील अन्य संशयितांना अटक करण्याची मागणी आपण करणार नाही. जनतेने आपल्याला आमदार बनवले आहे. त्यामुळे आपण नेहमीच जनतेसोबत राहू, असे आमदार नाईक यांनी प्रतिक्रिया दिली.एक वर्षानंतर अटकेची कारवाईमहसूल प्रशासनाच्या विरोधात कायदेभंग आंदोलन छेडल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या संशयितांना तब्बल एका वर्षाने पोलिसांनी अटक केली. त्यामुळे न्यायालय संशयितांबाबत कोणता निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते.दुपारी सर्व संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले. सायंकाळी उशिरा आमदार वैभव विजय नाईक यांच्यासह बबन विठ्ठल शिंदे, संतोष लक्ष्मण गावकर, पंढरीनाथ (भाऊ) सुरेश हडकर, गणेश लक्ष्मण तोंडवळकर, योगेश घन:श्याम भिसळे, अरुण (आबा) दयाळ खोत, रुपेश (विश्वास) खोत, स्वप्नील (बंटी) रघुवीर पेडणेकर, शेखर अंकुश तोंडवळकर, सतीश मुकुंद प्रभू, दिनेश पांडुरंग साळकर, कल्याण नंदू पाटील, यतीन परशुराम खोत या चौदा संशयितांची १५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली.
वैभव नाईकांसह १४ जणांना अटक
By admin | Published: May 03, 2016 10:43 PM