कुडाळ : कुडाळ आंबेडकरनगर येथील रहिवासी व आरपीआयचे सिंधुदुर्ग जिल्हा युवक अध्यक्ष बाबुराव अनंत केळुसकर (३१) यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तेथीलच १६ संशयितांवर कुडाळ पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यातील १४ जणांना मंगळवारी रात्री अटक करण्यात आली.
बुधवारी दुपारी चौदाही संशयित आरोपींना येथील न्यायालयात हजर केले असता तिघांना पोलीस कोठडी, तिघांना जामीन, तर उर्वरित आठ जणांना न्यायालयीन कोठडी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोमल सिंह रजपूत यांनी ठोठावली.
आरपीआय युवकचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष असलेल्या बाबुराव केळुसकर यांनी ४ मे रोजी विष प्राशन केले होते. गोवा-बांबोळी येथे उपचार सुरू असताना सोमवारी त्यांचे निधन झाले. तत्पूर्वी त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना ओरोस पोलिसांनी घेतलेल्या जबानीत वाडीतील काहीजणांनी आपल्याशी ३ मे रोजी वाद करून आपणास धमकावले होते. तसेच आपल्यावर दबाव आणून माझ्या दुकानात येऊन शटरवर लाथा मारल्या व हाणामारी केली. या नैराश्यातून आपण विष प्राशन केल्याचे त्यांनी म्हटले होते.
केळुसकर यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी प्राजक्ता केळुसकर हिने सोळा संशयितांविरोधात कुडाळ पोलिसांत तक्रार दिली होती. या तक्रारीवरून कुडाळ पोलिसांनी सर्व १६ संशयितांविरुद्ध विविध कलमांअन्वये गुन्हा दाखल केला व मंगळवारी रात्री उशिरा १४ जणांना अटक करण्यात आली.तिघांना एक दिवसाची पोलीस कोठडीया सर्व संशयितांना बुधवारी दुपारी कुडाळ येथील न्यायालयासमोर हजर केले असता भूषण कुडाळकर, विद्याधर कुडाळकर, प्रसाद जाधव या तिघांना एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. तर संतोषी जगन्नाथ कुडाळकर, मधुकर शरद कुडाळकर व संदेश संजय कुडाळकर या तिघांची प्रत्येकी पंधरा हजारांच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली.
उर्वरित आसिफ बागवान, तुषार जाधव, संकेत कुडाळकर, सागर कुडाळकर, जगन्नाथ कुडाळकर, शरद कुडाळकर, गणेश कुडाळकर, समीर कुडाळकर व अन्य एकास न्यायालयीन कोठडी ठोठावली तर विवेक कुडाळकर याच्यासह अन्य एकाला अटक करण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.