सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पुढील वर्षाच्या म्हणजे सन २०१६-१७ च्या १४० कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्यास राज्याचे अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मान्यता देत तो मंजूर केला आहे. या आराखड्यामधून पर्यटन विकास केंद्रबिंदू मानून जास्तीत जास्त निधी खर्च करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात १४० कोटींचा आराखडा मंजूर करून शासनाने जिल्हावासीयांना सुखद धक्का दिला आहे. मुंबई मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर सोमवारी राज्याचे अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीच्या वार्षिक आराखड्याची बैठक पार पडली. प्रत्येक जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्यावर चर्चा होऊन आराखडे मंजूर करण्यात आले. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आराखडाही मंजूर करण्यात आला आहे. यावेळी ग्रामविकास व वित्त राज्यमंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, अर्थ व नियोजन विभागाचे अप्पर सचिव सिताराम कुंठे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात, खासदार विनायक राऊत, आमदार नीतेश राणे, आमदार विजय सावंत आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आगामी सन २०१६-१७ चा वार्षिक नियोजन आराखडा ७५ कोटी ७७ लाखांच्या मर्यादेत करण्याचे आदेश राज्याच्या अर्थ व नियोजन विभागाने सिंधुदुर्गच्या नियोजन विभागाला दिले होते. परंतु चालू वर्षीच्या १२५ कोटी रुपयांच्या आराखड्यात वाढ करत १४० कोटी रुपयांचा जिल्हा वार्षिक आराखडा प्रस्तावित केला होता. २१ जानेवारीला सिंधुदुर्गची नियोजन समितीची सभा पार पडली. या सभेत अनेक विषयांवर प्रचंड गदारोळ माजला होता. यातच जिल्ह्याचा सन २०१६-१७ चा १४० कोटींचा जिल्हा वार्षिक नियोजन आराखडा मंजूर केला होता. पालकमंत्री केसरकर यांनी सभा संपल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन १४० कोटींचा आराखडा सभेत मंजूर झाल्याचे जाहीर केले. मात्र, आमदार नीतेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन १४० कोटींचा आराखडा सभेत मंजूर झाला नसल्याचे जाहीर केले होते. नियोजन समिती सभेत वार्षिक नियोजन आराखडा मंजुरीसाठी आलाच नसल्याचे सांगत केसरकर सभा अर्ध्यावर टाकून पळाल्याचा आरोप केला होता. (प्रतिनिधी) जिल्हावासीयांना सुखद धक्का ४दरम्यान, आमदार नीतेश राणे वार्षिक नियोजन आराखडा मंजूर झालेला नाही असे सांगत असतानाच राज्याचे अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सिंधुदुर्गचा १४० कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर करून जिल्हावासीयांना सुखद धक्का दिला आहे.
सिंधुदुर्गसाठी १४0 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
By admin | Published: February 03, 2016 12:00 AM