रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील पोलिस मुख्यालयाजवळ जुन्या पोलिस वसाहतीच्या जागेत पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी १४० कोटी रुपये खर्चाचे पोलिस गृहसंकुल उभारले जाणार आहे. यात ५२० सदनिका बांधल्या जाणार आहेत. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया येत्या चार महिन्यांत होईल. त्यानंतर ३ वर्षात या संकुलाची उभारणी पूर्ण होईल. विधानसभा अंदाज समितीच्या माध्यमातून हे काम मार्गी लागत असल्याची माहिती आमदार उदय सामंत यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. प्रकल्पाचा आराखडा बनविण्याचे काम दिलेल्या मिटकॉन कंपनीचे अधिकारी प्रमोद पवार यावेळी उपस्थित होते. सामंत म्हणाले, रत्नागिरीतील पोलिस कर्मचारी, अधिकारी यांची सध्या असलेली निवास व्यवस्था ही जुन्या पोलिस वसाहतीत आहे. मात्र, तेथे पोलिसांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते आहे. त्यामुळेच पोलिसांसाठी ५२० सदनिकांचे गृहसंकुल तसेच अधिकाऱ्यांसाठी बंगले, पोलिसांसाठी सुसज्ज व्यायामशाळा, वाचनालय, श्री महापुरुष मंदिराचे सुशोभीकरण, सभागृह, पोलिस कर्मचाऱ्यांसाठी वसतिगृह यांचा या प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे. या गृहसंकुलाचा आराखडा बनविण्याचे काम मिटकॉन कंपनीला देण्यात आले आहे. त्याबाबत सोमवारी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांच्यासोबत झालेल्या बैठकीत विस्तृत चर्चा झाली. यावेळी आमदार सामंत यांच्यासोबत नगराध्यक्ष राहुल पंडित, नगरसेवक किशोर मोरे, बिपीन बंदरकर, नगरसेविका वैभवी खेडेकर, स्मितल पावसकर, मिटकॉन कंपनीचे अधिकारी प्रमोद पवार व सहकारी अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर मुख्यालयाजवळील पोलिस वसाहतीची पाहणी करण्यात आली. (प्रतिनिधी)
पोलिसांसाठी १४० कोटींचे गृहसंकुल
By admin | Published: March 27, 2017 11:42 PM