कणकवली: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कणकवली येथील निवासस्थानी आंदोलन करणार असल्याचे काँग्रेसने सोमवारी जाहीर केले होते. तर ' तुम्ही येऊन दाखवाच ' असे प्रतिआव्हान भाजपकडून देण्यात आले होते. मात्र, आंदोलन करणारे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या कणकवली येथील ओमगणेश बंगला येथे पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे भाजप-काँग्रेसमधील संभाव्य राडा मंगळवारी टळला. काँगेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी राणेंच्या बंगल्यासमोर आंदोलन करणार असा इशारा दिला होता. त्यानुसार कणकवली तहसीलदार कार्यालयाजवळील श्रीधर नाईक गॅस एजन्सी जवळील काँग्रेस कार्यालयातून जोरदार घोषणा देत आज, मंगळवारी सकाळी ११.२० वाजण्याच्या सुमारास काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते बाहेर पडले होते. ते सर्व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवसस्थानाजवळ जाण्यासाठी निघाले होते.
यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते कणकवली तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारा समोर येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये घातले. तसेच त्यांना थेट पोलीस ठाण्यात नेले. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे आंदोलन तिथेच स्थगित झाले. या दरम्यानच्या कालावधीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधी जोरदार घोषणा दिल्या. तसेच पंतप्रधानांनी काँग्रेसची माफी मागावी अशी मागणीही केली. काँग्रेसच्या आंदोलनाला जशास तसे उत्तर देण्यासाठी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सकाळपासूनच कणकवली येथील मंत्री राणे यांच्या निवासस्थानी उपस्थित होते. काँग्रेसचे आंदोलनकर्ते मंत्री राणेंच्या निवासस्थानी आंदोलनासाठी आले तर परत जाणार नाहीत असा इशाराही भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला होता. या सर्वच पार्श्वभूमीवर कणकवलीत पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला होता. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचा प्रयत्न पोलीस करत होते.काँग्रेस कार्यालयात काही पदाधिकारी जमा झाल्यावर तेथून झेंडे आणि फलक घेऊन जिल्हा अध्यक्ष बाळा गावडे, तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, जिल्हा सरचिटणीस महिंद्र सावंत, महेश तेली, प्रवीण वरूणकर यांच्यासह कार्यकर्ते बाहेर पडले. पण आंदोलकांना रोखण्यासाठी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी स्वतःच्या नियंत्रणात पोलीस पथके सज्ज केली होती. त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह १५ काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. नाना पटोलेना सुबुद्धी देभाजप तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी रामेश्वर देवतेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना चांगली बुद्धी दे असे मालवणी भाषेत गाऱ्हाणे घातले. त्यानंतर काही वेळाने हे आंदोलक बंगल्यावर येत नसल्याचा निरोप पोचल्याने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते तेथून आपापल्या घरी रवाना झाले. काँग्रेसची दखल घेतली !भाजपने आम्हाला प्रतिआव्हान दिले असले तरी त्यांनी काँग्रेसच्या आंदोलनाची दखल घेतल्याचे सिद्ध झाले आहे. आमचा नरेंद्र मोदी यांना विरोध असून आमचे आंदोलन विविध माध्यमातून सुरूच राहणार आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी काँग्रेसची माफी मागावी. असे काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी यावेळी सांगितले.