वेंगुर्ले : खानोली कोंडुरावाडी येथील धोकादायक उतारावर सहा आसनी रिक्षाचालकाचा ब्रेक फेल झाल्याने गाडीवरील ताबा सुटल्याने रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात चालकासह एकूण पंधराजण जखमी झाले. यातील एका गंभीर जखमी झालेल्या महिलेस अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे तर इतर रुग्णांना कुडाळ येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. होडावडा येथील धावडे, लाड व वेंगुर्ले कॅम्प येथील परब कुटुंबिय व नातलग असे एकूण १५ जण वायंगणी कोंडुरावाडी येथे सहाआसनी रिक्षातून (एमएच 0७ एफ ३0२) पर्यटनासाठी वेंगुर्लेतून निघाले होते. सदर रिक्षा वायंगणी कोंडुरावाडी येथील तीव्र उतारावर आली असता ब्रेक फेल झाल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे गाडी प्रथम रस्त्याकडेच्या आंब्याच्या झाडाला धडकली व त्यानंतर उलटी झाली. यामध्ये होडावडा येथील अंकिता प्रशांत धावडे (२0), स्नेहा दिलीप धावडे (२२), दिव्या दिलीप धावडे (१३), श्रध्दा दिलीप धावडे (६0), प्रशांत दामोदर धावडे (४१), जोत्स्ना उर्फ प्राजक्ता प्रशांत धावडे (४0), अक्षता प्रशांत धावडे (१0), गायत्री गणेश लाड (३४), रुद्र गणेश लाड (४), आर्यन गणेश लाड (८), वेंगुर्ले कॅ म्प येथील गजानन रमेश परब (२२), रेश्मा रमेश परब (४८), रमेश चुडामणी परब(६0), विजय रमेश परब(२३) तर चालक रामचंद्र लक्ष्मण कुंभार (३५) रा. कुंंभारटेंब हे सर्वजण जखमी झाले आहेत. अपघातानंतर जखमींना ग्रामस्थ बाळा तांडेल, सुभाष पेडणेकर, संतोष पेडणेकर, राजू पेडणेकर, विनायक पेडणेकर, महेश पेडणेकर यांनी रामकृष्ण पेडणेकर व आत्माराम मांजरेकर यांच्या खासगी वाहनातून वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात आणले. यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश जाधव व डॉ. चव्हाण यांनी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर सर्वांना कुडाळ येथील खासगी रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या जोत्स्ना धावडे यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
रिक्षा अपघातात १५ जण जखमी खानोली कोंडुरावाडीतील घटना
By admin | Published: May 24, 2014 12:57 AM