ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात जिल्हा नियोजन निधीतून साडेसात कोटींची रस्त्यांची कामे सुचविण्यात येत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रत्येक मतदारसंघात रस्ते विकासाचा १५ लाख रुपये निधी खर्च होईल अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संदेश सावंत यांनी दिली.जिल्हा नियोजनचा निधी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्रत्येक मतदारसंघात समान पद्धतीने खर्च व्हावा यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघातील १५ लाख खर्चाच्या रस्त्याचा समाविष्ट करून रस्ते विकासाच्या आराखडा जिल्हा परिषदेने तयार केला आहे. हा आराखडा नियोजन विभागाकडे सादर होणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात नियोजन फंडातून रस्त्याची १५ लाखांची कामे होणार असल्याचेही संदेश सावंत यांनी सांगितले.जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे व त्या समितीच्या सदस्यांचे कोणतेही अधिकार आपण वापरलेले नाहीत. प्रत्येक जिल्हा परिषद सदस्यांना स्वनिधीतून पाच लाखांची कामे करण्याचा अधिकार आहे. ती मग बांधकाम विभागाची असो की अन्य कोणत्याही खात्याची असोत. त्यांनी सुचविलेल्या कामांप्रमाणे हा खर्च होतो. ५० सदस्यांनी सुचविलेल्या कामांप्रमाणे हा खर्च होतो. ५० सदस्यांनी सुचविलेल्या कामांप्रमाणे हा निधी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांकडे वर्ग करण्यात येतो व जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी दिलेल्या मर्यादेप्रमाणे खर्च होतो. बांधकाम समितीच्या ज्या सदस्यांनी आरोप केले आहेत त्यांनाही रस्ते विभागाव्यतिरिक्त कृषी, ग्रामपंचायत, ग्रामीण पाणीपुरवठा या विभागाच्या कार्यक्षेत्रातील नळयोजना, विहिरी, ताडपत्री, विद्युत मोटार व पंप आदी पुरवठ्यांची कामे देण्यात आली आहेत. त्यामुळे या सदस्यांचे आरोप निराधार असल्याचेही अध्यक्षांनी सांगितले. तसेच सभापती अथवा जिल्हा परिषदेतील काही दालनावर जो खर्च झाला तो आपल्याला असलेल्या अधिकारात खर्च करण्यात आला आहे. सभापतींची दालने सुशोभित करण्यात गैर नाही. अध्यक्ष निधीतून हा खर्च झाला असून हा खर्च करण्याचा आपला अधिकार असल्याने या खर्चातही कोणतेही गैर नाही असेही संदेश सावंत यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)
रस्ते विकासासाठी प्रत्येक मतदार संघात १५ लाखांचा निधी : सावंत
By admin | Published: October 16, 2015 10:00 PM