कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६ डायलिसीस मशीन्स आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंजूर केली आहेत. सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून ही मशीन्स मंजूर करण्यात आली असून तंत्रज्ञांसह लवकरच जिल्ह्यातील रुग्णसेवेसाठी ही मशीन्स उपलब्ध होतील, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत शनिवारी दिली. ओरोस येथील जिल्हा रुग्णालय, कणकवली उपजिल्हा रुग्णालय देवगड व मालवण ग्रामीण रुग्णालयासाठी प्रत्येकी ४ डायलिसीस मशीन्स दिली जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी याला मंजुरी दिली आहे. आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांच्या प्रयत्नांतून कणकवली उपजिल्हा रुग्णालयासह मालवण व देवगड ग्रामीण रुग्णालयातील ब्लड स्टोअरेज युनिट लवकरच सुरू होणार असून जिल्हा रुग्णालयात स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सीटी स्कॅन यंत्र आणण्याचा प्रयत्न आहे. सिंधुदुर्गात नियुक्त बीएचएमएस डॉक्टर्सनी बदली करून घेतल्याने जिल्ह्यात ८ डॉक्टर्सची पदे रिक्त झाली होती. ही पदे लवकरच भरण्यात येणार असून अस्थायी डॉक्टरांची अकरा महिन्यांच्या मुदतीनंतर पुन्हा भरतीप्रक्रिया न राबवता मुदतवाढ देण्यात येणार आहे. तसेच येत्या आठ दिवसांत जिल्ह्याला सिव्हिल सर्जन नियुक्त करण्यात येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितल्याचे आमदार नाईक म्हणाले. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात १६ डायलिसीस मशीन्स मंजूर : वैभव नाईक
By admin | Published: April 12, 2015 10:01 PM