सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गजिल्हा परिषदेतील विविध विभागातील ३३४ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात असून या पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. यात ३३४ जागांसाठी तब्बल १६२८७ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यात सर्वाधिक कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी ४२७६ अर्ज आले आहेत.सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमधील ३३४ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यास शासनाने मान्यता दिली होती. त्यानुसार या पदांसाठी जिल्हा परिषदमार्फत ५ ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ५ ते २५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातील मिळून तब्बल १६ हजार २८७ उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत.
यात सर्वाधिक अर्ज हे ग्रामसेवक पदासाठी आले आहेत. आरोग्य पर्यवेक्षक एका जागेसाठी ४ अर्ज, आरोग्यसेवक (पुरुष) ५५ पदांसाठी ३००१, आरोग्य परिचारिका (महिला) १२१ पदे ८३२, औषध निर्माण अधिकारी ११ पदे ८४८, कंत्राटी ग्रामसेवक ४५ जागांसाठी ४२७६, कनिष्ठ अभियंता (बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा) २९ जागांसाठी १७३६, कनिष्ठ अभियंता (विद्युत) २ जागांसाठी ७२७, कनिष्ठ लेखा अधिकारी २ जागांसाठी ३२, कनिष्ठ सहायक लेखा ४ जागांसाठी २७४, तारतंत्री (वायरमन) एका जागेसाठी २४९, मुख्य सेविका/पर्यवेक्षिका २ जागांसाठी ३२८, पशुधन पर्यवेक्षक १८ जागांसाठी १२७, प्रयोगशाळा तंत्रज्ञ २ जागांसाठी ३५९, वरिष्ठ सहायक ४ जागांसाठी ११११, वरिष्ठ सहायक लेखा ७ जागांसाठी ५३७, विस्तार अधिकारी (कृषी) ३ जागांसाठी ४५३ तर स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (बांधकाम / लपा) २७ पदांसाठी १३९३ अर्ज आले आहेत.