कणकवली: कणकवली विभागात महावितरणची एकूण थकबाकी १६ कोटी ८५ लाख रूपयापर्यत पोहोचली आहे. यात सर्वाधिक थकबाकी पथदिपांची आहे.पथदिपांच्या वीज पुरवठ्यापोटी ४ कोटी १४ लाख थकबाकी ग्रामपंचायतीकडून येणे आहे. तसेच घरगुती, व्यापारी, शासकीय, पाणीपुरवठा, औद्योगिक शेती या वीज ग्राहकांकडे थकबाकी आहे. त्यामुळे ग्राहकांनी विजबिले भरून सहकार्य करावे. तसेच वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई टाळावी. गणेश चतुर्थीपूर्वी ग्राहकांनी ऑनलाइन पध्द्तीने वीज बिल भरून ०.२५ ची सवलत मिळवावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी केले आहे.कणकवली विभागात घरगुती ग्राहकांजवळ ४ कोटी २५ लाख, व्यापारी १ कोटी ३२ लाख, औद्योगिक १ कोटी ५१ लाख, कृषीपंप २ कोटी २८ लाख, शासकीय कार्यालय ४२ लाख, पाणी पुरवठा २ कोटी ७९ लाख, स्ट्रीट लाईट योजना ४ कोटी १४ लाख, शेतीपंप अन्य वापर १४ लाख एवढी थकबाकी आहे. या उपविभागातील ४७ हजार ७१० ग्राहकांकडे १६ कोटी ८५ लाख रुपये एवढी वीज वितरणची थकबाकी आहे.महावितरणला बाहेरील कंपन्यांकडून विज खरेदी करावी लागते. दर महिन्याला वीजचे पैसे द्यावे लागतात, त्यामुळे ग्राहकांनी दर महिन्याला आपले वीज बील भरणे अपेक्षित आहे. वीज बिल थकबाकीची कारवाई होण्याची वाट ग्राहकांनी पाहू नये. आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडून दरमहा विज सेवेबरोबरच ग्राहकांकडील वीज बिल वसुलीचे उद्दिष्ट दिले जाते. त्यामुळे वीज ग्राहकांनी वीज वितरण कंपनीला आपली वीज बिले भरून सहकार्य करावे.
सिंधुदुर्गात ६० टक्के पेक्षा जास्त ग्राहक ऑनलाईन पद्धतीने वीज बिल भरणा करत असल्याचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी सांगितले. त्यामुळे गणेश चतुर्थीमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ग्राहकांनी पुढाकार घेवून थकित वीज बिले भरून सहकार्य करावे, असे आवाहन मोहिते यांनी केले आहे.