सिंधुदुर्गनगरी दि. 29 : आपत्ती निवावरण दिवसाचे औचित्य साधून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग अंतर्गत जिल्हा नियोजन समिती सभागृह (जुने), जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयालयीन विद्यार्थी वर्गासाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीमती. राजश्री सामंत, परीक्षक म्हणून अल्ताफ खान, प्रा. सुभाष बांबूळकर, प्रवीण सुलोकार हे उपस्थित होते.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी सांगितले की, आपत्तीत होणा-या नुकसानीचा आकडा कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची भूमिका फार मोलाची आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक प्रकारच्या आपत्तींचे पुर्वानुमान करणे शक्य झालेले आहे. त्यामुळेच आजच्या तरुण पिढीने हे तंत्रज्ञान आत्मसात करावे आणि लोक प्रबोधनास हातभार लावावा हे या स्पर्धा आयोजनाचे मुख्य कारण आहे असे यावेळी त्यांनी सांगितले.
या वक्तृत्व स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना विषयांची मांडणी, विषयाची समज, वेळेचे नियोजन, वक्तृत्व शैली, आपण मांडलेल्या विषयाचा समोरील व्यक्तींवर पडलेला प्रभाव, इतरांना प्रेरणा मिळेल यावर गुणाकंन ठरविले जातील.या स्पर्धेत एकूण 18 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यामध्ये प्रथम क्रमांक राजश्री बेळेकर आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी , व्दितीय - विनिता पांजरी टोपीवाला हायस्कूल मालवण, तृतीय क्रमांक - गीतांजली परब वासुदेवानंद सरस्वती महाविद्यालय यांनी क्रमांक पटकाविले. यावेळी विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.