सिंधुदुर्गनगरी : इटली, चीन या देशांमध्ये कोरोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे. अशा देशातून आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. १२ मार्चपासून देशाने व्हिसा नाकारला आहे. त्यामुळे हे परदेशी यापूर्वीच देशात आलेले आहेत. ८ मार्चपासून आतापर्यंत अशा ३९ परदेशी पाहुण्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. यातील एकही कोरोनासदृश आढळलेला नाही. यातील काही आपल्या देशातसुद्धा गेले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी सांगितले.
कोरोना आजाराबाबत घेण्यात आलेल्या खबरदारीची माहिती देण्यासाठी शल्यचिकित्सक चाकुरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माहिती देताना चाकुरकर म्हणाले, जगात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये वयस्कर व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे वयस्कर, मधुमेही, गरोदर महिला, अन्य आजार असलेल्या व्यक्तींना हा आजार जडण्याची शक्यता जास्त असते, असे ते म्हणाले. तसेच मास्क सर्वांनी वापरण्याची गरज नाही. केवळ बाधित रुग्ण व त्याच्यावर उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांनी मास्क वापरण्याची गरज आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हा आजार होऊ नये म्हणून केवळ काळजी घेणे, हा एकमेव पर्याय आहे. यासाठी हँडवॉशने हात धुणे गरजेचे आहे. त्यामुळे एसटी स्टॅण्डसारख्या सार्वजनिक ठिकाणी येणाºया नागरिकांना हात धुण्यासाठी मुबलक पाणी व हँडवॉशची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन डॉ. चाकुरकर यांनी केले आहे. जिल्ह्याच्या सहा चेकपोस्टवर तपासणी करण्यात येत आहे. त्याशिवाय आता रेल्वेस्टेशन व एसटी स्टॅण्ड येथेही तपासणी पथके ठेवण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
जे आपल्या जिल्ह्यात राहतात. ते कामानिमित्त परदेशात राहतात किंवा फिरायला परदेशात गेले होते, त्यांचीही तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये एकूण अकरा जणांचा समावेश आहे. यात थायलंड २, मलेशिया-सिंगापूर २, सौदी अरेबिया ६ व फ्रान्स १ या देशांत जाऊन आलेल्यांची तपासणी केली असल्याची माहिती यावेळी डॉ. चाकुरकर यांनी दिली.
...तरच कोरोना आजाराचा प्रसार होतो
एकादा रुग्ण कोरोना व्हायरस बाधित झाला म्हणून त्याच्यापासून याचा फैलाव होतो, असे नाही. या रुग्णाला खोकला येणारच. तो खोकत असताना त्याच्या तोंडातून हे विषाणू बाहेर पडणार. ते बाहेर पडलेले विषाणू नजीकच्या व्यक्तीच्या शरीरात गेले तरच या आजाराचा प्रसार होतो, असे यावेळी डॉ. चाकुरकर यांनी सांगितले.