बांदा : बांदा पोलिसांनी अवैध दारू वाहतुकीच्या विरोधातील कारवाईचा सपाटाच लावला असून, शुक्रवारी पहाटे बांदा पोलिस तपासणी नाक्यावर गोव्याहून मुंबईच्या दिशेने कंटेनरमधून होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई करीत तब्बल १८ लाख ८६ हजार ४00 रुपये किमतीच्या दारूसह एकूण ३६ लाख ६ हजार ४00 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. बांदा पोलिसांची गेल्या वर्षभरातील ही दारू वाहतुकीच्या विरोधातील सर्वांत मोठी कारवाई आहे.याप्रकरणी कंटेनरचालक मोहत सलिम खान (वय ३0, रा. रिटवा, उत्तर प्रदेश) याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. कंटेनरच्या मागील हौद्यात खास तयार करण्यात आलेल्या कप्प्यात गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स लपवून ठेवण्यात आले होते. बांदा पोलिसांनी या कप्प्यातूून तब्बल ६५५ गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स जप्त केले.गोव्यातून मुंबईच्या दिशेने कंटेनरमधून (एमएच 0४ ईएल ७0८३) गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बांद्याचे सहा. पोलिस निरीक्षक प्रदीप गीते, उपनिरीक्षक सुधाकर आरोलकर, हवालदार विनोद चव्हाण, जे. डी. सावंत यांनी बांदा पोलिस तपासणी नाक्यावर सापळा रचला होता. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास कंटेनर तपासणीसाठी थांबविण्यात आला. मात्र, कंटेनरच्या पाठीमागील हौद्यात रिकामी बॅरल व ाावडरच्या पिशव्या ठेवण्यात आल्या होत्या. चालकाकडे चौकशी केली असता त्याने समर्पक उत्तरे न दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. दारू वाहतुकीसाठी खास कप्पाबांदा पोलिसांनी कंटेनर थेट पोलिस ठाण्यात आणला. चालकाला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने चालकाच्या केबिनच्या मागे दारूच्या बॉक्ससाठी खास कप्पा तयार केल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी चालकाच्या पाठीमागे दारू वाहतुकीसाठीच खास तयार करण्यात आलेला लोखंडी दरवाजा तोडला असता आतमध्ये दारूचे बॉक्स आढळले. दोन दरवाजांच्या साहाय्याने१0 फूट लांब व ७ फूट उंची असलेला खास कप्पा तयार करण्यात आला होता. पोलिसांनी गोवा बनावटीच्या रियल सेव्हन व्हिस्की ब्रॅण्डचे १८ लाख ८६ हजार ४00 रुपये किमतीचे ६५५ बॉक्स जप्त केले. तसेच १७ लाख रुपये किमतीचा कंटेनर व २0 हजार रुपयांचे रिकामी बॅरल व रॉ मटेरियल जप्त केले. चालकाने ही दारू गोवा येथून भरली असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
१९ लाखांची अवैध दारू जप्त
By admin | Published: February 10, 2017 10:49 PM