बांदा : गोव्याहून रायगडकडे जाणाऱ्या खासगी आरामबसमधून होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात बांदा इन्सुली पोलीस तपासणी नाक्यावर स्थिर निरीक्षण पथकाने (एसएसटी) कारवाई केली. गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या उरण (जि. रायगड)मधील बसचालक व क्लिनरसह १९ प्रवाशांना ताब्यात घेतले.या कारवाईत १ लाख ६५ हजार ४११ रुपयांच्या दारुसह एकूण १३ लाख ६५ हजार ४११ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. बांदा इन्सुली पोलीस तपासणी नाक्यावर १९ संशयित प्रवाशांच्या विरोधातील ही पहिलीच कारवाई आहे. ही कारवाई शनिवारी सकाळी करण्यात आली.
सायंकाळी उशिरापर्यंत बांदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.शनिवारी गोव्यातून येणारी खासगी आरामबस तपासणीसाठी थांबविण्यात आली. तपासणी दरम्यान प्रवाशांच्या सामानाच्या बॅगेमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीचा दारुसाठा आढळून आला.बेकायदा दारू वाहतूकप्रकरणी चालक राजेंद्र सत्यवान कवडे (४५, सातारा), क्लिनर शैलेश हरिश्चंद्र सुर्वे (रा. हडी-मालवण), मनीष काशिनाथ पाटील (४३), संतोष चंद्रकांत पाटील (३२), मनोज जगन्नाथ पाटील (२९), विशाल वासुदेव ठाकूर (३३), राजेंद्र सुभाष ठाकूर (३३), संजय रमेश ठाकूर (३९), रोशन अरविंद जाधव (३०), कुणाल मधुकर भोईर (२९), दिनेश तुकाराम पाटील (३०), रतीश अर्जुन पाटील (२८), रोमेश भारत ठाकूर (३४), नरेश शिवराम म्हात्रे (६४), प्रणय बिपीन ठाकूर (२६), यज्ञेश गणेश भोईर (२६), समीर चंद्रकांत ठाकूर (२७), कल्पेश सुभाष ठाकूर (३०), अभिजीत देवानंद ठाकूर (२६, सर्व रा. भंडखळ, ता. उरण) यांच्यावर कारवाई करण्यात आली.या कारवाईत गोवा बनावटीच्या दारुचे विविध उंचीचे ब्रँड होते. या कारवाईत १ लाख ६५ हजार ४११ रुपयांच्या दारुसह एकूण १३ लाख ६५ हजार ४११ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेत बसचालक व क्लिनरसह १७ प्रवाशांना ताब्यात घेतले.