ओरोस : कर्जमाफीची तिसरी यादी शासनाने अद्याप जाहीर केलेली नाही. ३१ मार्च २०२० पर्यंत जिल्ह्यातील ८ हजार ७७ शेतकऱ्यांना ३२ कोटी ६९ लाख एवढी कर्जमाफी त्यांच्या खात्यात जमा झाली होती. त्यानंतर एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांत आणखी केवळ ८५ शेतकऱ्यांच्या खात्यात ही कर्जमाफी रक्कम जमा झाली आहे. ३८ लाख २५ हजार ३१५ रुपये एवढी ही रक्कम आहे.परिणामी आतापर्यंत ८ हजार १५२ शेतकऱ्यांच्या खात्यात ३३ कोटी ७ लाख २५ हजार ३१५ रुपये एवढी रक्कम जमा झाली आहे. तर यादीत नाव न आलेले १ हजार १८३ आणि यादीत नाव येऊन आधार प्रमाणीकरण न झालेले ७८२ असे एकूण १ हजार ९६५ शेतकरी कर्जमाफीपासून अजूनही वंचित आहेत.आॅगस्ट ते सप्टेंबर २०१९ या दोन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना २०१९ जाहीर केली होती. त्याचा अध्यादेश २७ डिसेंबर २०१९ रोजी काढण्यात आला. पहिली यादी २८ फेब्रुवारी २०२० रोजी काढण्यात आली. त्यानंतर दुसरी यादी जाहीर केली. जिल्ह्यात या योजनेत ११ हजार ३ शेतकरी पात्र ठरले होते. यातील पहिल्या दोन याद्यांत मिळून ९८२० शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध करण्यात आली होती. ११८३ नावे प्रसिद्ध झाली नव्हती. उर्वरित नावे तिसºया यादीत असतील असे शासनाने जाहीर केले होते.अल्प मुदतीचे शेती कर्ज घेत व्याजासह २ लाख रुपयांची थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांही कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती. पहिल्या व दुसऱ्या यादीत मिळून नावे प्रसिद्ध झालेल्या शेतकऱ्यांना महा-ई सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करण्याचे बंधन घातले आहे. जिल्ह्यात पहिल्या दोन प्रसिद्ध याद्यांमध्ये मिळून ९ हजार ८२० शेतकऱ्यांपैकी ९ हजार ५१ शेतकºयांचे आधार प्रमाणीकरण झालेले आहे. तर ७८२ शेतकºयांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही.मात्र, यातील ८ हजार १५२ शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफी रक्कम जमा झालेली आहे. तर यादीत नाव येऊनही आधार प्रमाणीकरण झाले नसल्याने ७८२ शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफी रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे ते या रकमेकडे डोळे लावून आहेत.महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी योजनेची तिसरी यादी तीन महिन्यांपासून रखडलीमहात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना २०१९ ची तिसरी यादी तीन महिन्यांहून अधिक काळ रखडली आहे. परिणामी जिल्ह्यातील १ हजार १८३ लाभार्थी कर्जमाफी यादीत नाव येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यादीत नाव येऊन आधार प्रमाणीकरण झाले नसल्याने ७८२ शेतकऱ्यांना खात्यात कर्जमाफी रक्कम जमा होऊ शकली नाही.
मार्च महिन्यात दुसरी यादी आली. मात्र, त्यानंतर तीन महिने उलटले तरी प्रसिद्ध ७८२ शेतकरी प्रतीक्षेत आहेत. याच काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाले. त्यानंतर लॉकडाऊन शिथिल झालेतरी आधार केंद्रात जाण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रमाणीकरण रखडले. परिणामी शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले.