वेंगुर्ले : वेंगुर्ले शहरातील सिंडिकेट बँकेतील पाच खातेदारांच्या खात्यावरील अंदाजित २ लाखांच्या पैशांचा अपहार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वेंगुर्ले शाखेतील शाखा व्यवस्थापकांच्या सर्तकतेमुळे ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी प्रधान कार्यालयाच्या आदेशानुसार सिंडिकेट बँक वेंगुर्ले शाखेतील श्रीकृष्ण गुरुनाथ लोणे या लिपिकाला निलंबितही केले असून त्याच्या निलंबितबाबतची नोटीस या बँकेत लावण्यात आली आहे. सिंडिकेट बँक वेंगुर्ले शाखेतील नोटीस बोर्डवर लावलेल्या निलंबनाच्या नोटीसीत श्रीकृष्ण लोणे यांनी आपल्या मुलाचे त्याच बँकेतील खाते वापरुन या पैशांची अफरातफर केली आहे. बँकेने लोणे यांना दिलेला वैयक्तीक कोड व आयडी यांचा बेकायदेशीर वापर करुन बँकेतील ग्राहकांच्या खात्यावरील पैशांचा घोटाळा केला. तसेच बँकेच्या नियमांचे उल्लंघन करुन आपला आर्थिक स्वार्थ साधला असल्याचे नमूद केले आहे. ही घटना शाखा व्यवस्थापक मराठे यांच्या लक्षात येताच त्यांनी लोणे यांच्या खात्याची तपासणी केली असता त्यात ही अफरातफर उघडकीस आली. दरम्यान, शाखा व्यवस्थापकांनी ज्या ग्राहकांच्या खात्यावरील रकमेची अफरातफर झाली आहे अशा ग्राहकांना याबाबत कल्पना देत हे प्रकरण प्रधान कार्यालयाकडे सोपविले. प्रधान कार्यालयाने याबाबत अधिक चौकशी केली असता १९ आॅक्टोबर रोजी श्रीकृष्ण लोणे यांना निलंबनाची नोटीस बजाविली. दरम्यान, ही कारवाई बँकेपुरतीच मर्यादित असल्या कारणाने या गुन्ह्याची अन्य कुठेही नोंद करण्यात आली नाही. या घटनेचे वृत्त शहरात समजताच बँकेच्या खातेदारांनी त्वरित बँकेशी संपर्क साधून आपली रक्कम सुरक्षित असल्याची खात्री केली. (प्रतिनिधी)लोणे दोषी आढळल्यास कडक कारवाई होणारश्रीकृष्ण लोणे यांना निलंबनाची प्रक्रिया होईपर्यंत बँकेत कोणताही आर्थिक व्यवहार करता येणार नसून या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांना त्यांच्या पगारातील एक तृतीयांश पगार मिळणार आहे. जोपर्यंत लोणे यांच्यावरील आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया चालू राहील. श्रीकृष्ण लोणे यांना निर्दोष असल्याचे सिद्ध करायचे असल्यास ते बँकेच्याविरोधात आपल्या वकिलाची नेमणूक करु शकतात व हे आरोप खोटे असल्यास बँकेकडून त्यांना त्यांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे.परंतु लोणे हे यात दोषी ठरल्यास त्यांना पुढील कडक कारवाईला सामोरे जावे लागेल.
वेंगुर्लेतील सिंडिकेट बँकेच्या शाखेत २ लाखांचा अपहार
By admin | Published: November 19, 2015 10:20 PM