रत्नागिरी : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मंडळातर्फे आॅक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल जाहीर झाला आहे. कोकण विभागीय मंडळाचा एकूण निकाल २०.२० टक्के इतका लागला आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मंडळातर्फे एकूण ९ विभागीय मंडळातून ७८ हजार ७७ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होते, त्यापैकी ७६ हजार २७० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १६ हजार ४६४ विद्यार्थी पास झाल्याने एकूण निकाल २१.५९ टक्के इतका लागला आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा मिळून कोकण विभागीय मंडळातून ७१७ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होते. पैकी ६९३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १४० विद्यार्थी पास झाले असून, निकाल २०.२० टक्के इतका लागला आहे.कोकण परीक्षा मंडळातून ५२२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. पैकी ५०५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ९८ विद्यार्थी पास झाले. एकूण निकाल १९.४१ टक्के इतका लागला आहे, तर १९५ मुलींनी अर्ज भरले होेते. त्यापैकी १८८ मुली परीक्षेला बसल्या होत्या. ४२ विद्यार्थिनी पास झाल्याने २२.३४ टक्के निकाल लागला आहे. त्यामुळे मुलींनी आपला झेंडा राखला आहे. विज्ञान, कला, वाणिज्य, एमसीव्हीसी शाखांपैकी सर्वाधिक निकाल एमसीव्हीसी शाखेचा लागला आहे. राज्यात सर्वाधिक निकाल औरंगाबाद विभागाचा लाभला आहे. या विभागातून ५ हजार ८३१ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते, पैकी ५ हजार ६८५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील २ हजार ६१ विद्यार्थी पास झाले आहेत. एकूण निकाल ३६.२५ टक्के इतका लागला आहे. त्यापाठोपाठ निकाल लातूर विभागाचा लागला आहे. या विभागातून ३८२३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते, पैकी ३ हजार ७३६ परीक्षेला बसले होते, त्यातील १ हजार ९० विद्यार्थी पास झाले आहेत. निकालामध्ये तृतीय क्रमांक नागपूर विभागाचा लागला आहे. ८ हजार २५४ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते, पैकी ५ हजार ६८५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील २ हजार ६१ विद्यार्थी पास झाले आहेत. एकूण निकाल २३. ८२ टक्के लागला आहे.सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. २१ हजार २६१ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होते, पैकी २० हजार ८४३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यातील ३ हजार ७३५ विद्यार्थी पास झाले असून, एकूण निकाल १७.९२ टक्के इतका लागला आहे. नऊ विभागातून मुंबई विभागाचा निकाल घसरला आहे. कोकण व कोल्हापूर विभागाचा निकाल मात्र सारखा आहे. कोल्हापूर विभागातून ७ हजार ४१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते, पैकी ६ हजार ८४३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. १३८६ विद्यार्थी पास झाले असून, एकूण निकाल २०.२० टक्के इतका लागला आहे.परीक्षार्थींना गुणपत्रिकेचे वितरण दि. २० रोजी दुपारी ३ वाजता संबंधित कनिष्ठ महाविद्यालयातर्फे करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
कोकण विभागाचा २० टक्के निकाल
By admin | Published: November 17, 2015 9:51 PM