महाड : सावित्री पूल दुर्घटनेत वाहून गेलेल्या वाहनांमधील बेपत्ता प्रवाशांचा शोध सलग तिसऱ्या दिवशी शुक्रवारी देखील युद्धपातळीवर सुरू होता. सायंकाळी ५ वाजेपर्यंत यापैकी २२ मृतदेह हाती लागले आहेत. तर, गुरुवारी एका पत्रकाराला धमकी दिल्याबद्दल गृहनिर्माणमंत्री व रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.महाडच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात बेपत्ता प्रवाशांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. मात्र अन्य बेपत्ता प्रवाशांचा शोध लागत नसल्याने गेल्या तीन दिवसांपासून या ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या नातेवाईकांची चिंता वाढतच चालली आहे. एका वृत्तवाहिनीच्या वार्ताहराला धमकी तसेच धक्काबुक्की केल्याप्रकरणी रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्याविरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधित वाहिनीच्या संपादकांनी तक्रार दाखल केली आहे.सावित्री पूल दुर्घटनेच्या ठिकाणी गुरुवारी पालकमंत्री भेट देण्यासाठी आले असता, मिलिंद तांबे या वार्ताहराने विचारलेल्या प्रश्नाला मेहता यांनी उद्धटपणे उत्तरे देत अर्वाच्च भाषा वापरली. तसेच यावेळी तांबेंना धमकावत धक्काबुक्की व शिवीगाळ करण्यात आली, अशा प्रकारची तक्रार संपादकांनी दिली आहे. त्यामुळे तांबे यांच्या जीवीला धोका असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. (वार्ताहर)
महाड दुर्घटनेत २२ मृतदेह सापडले
By admin | Published: August 05, 2016 11:16 PM