बांदा : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मुंबईतून गोव्याच्या दिशेने कंटेनरमधून नेण्यात येणारे १७ हजार २00 लिटर स्पिरीटसह २३ लाख २0 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. झाराप-पत्रादेवी बायपासवर इन्सुली येथे ही कारवाई शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास करण्यात आली. स्पिरीटची वाहतूक प्लास्टिकच्या ८८ बॅरलमधून करण्यात येत होती. तब्बल दोन तास थरारक पाठलाग करून कारवाई केली. मात्र, काळोखाचा फायदा घेत कंटेनरचालकाने पलायन केले. कंटेनरमधून स्पिरीटची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क खात्याचे जिल्हा अधीक्षक संतोष झगडे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी भरारी पथकाला सापळा रचण्यास सांगितले होते. भरारी पथकाने या कंटेनरला पकडण्यासाठी लांजा येथे सापळा रचला होता. मात्र, भरारी पथकाला हुलकावणी देत कंटेनर गोव्याच्या दिशेने मार्गस्थ झाला. याची कल्पना पथकाला उशिराने मिळाल्याने पथकाने या कंटेनरचा तब्बल दोन तास पाठलाग केला. भरारी पथक पाठलाग करत असल्याची कुणकुण चालकाला लागल्याने चालकाने कंटेनर इन्सुली येथे रंगीला राजस्थानी धाब्याजवळ उभा करून तेथून पलायन केले. इन्सुली येथील रंगीला राजस्थानी धाब्याजवळ कंटेनर (केए 0९ एएल ३२४७) कारवाईपूर्वी पंधरा मिनीटे अगोदर उभा करून ठेवण्यात आला होता. या कंटेनरमधील स्पिरीटची बनावट दारुच्या निर्मितीसाठी गोव्यात वाहतूक करण्यात येत होती. संतोष झगडे यांनी या कंटेनरची तपासणी करण्याचे आदेश भरारी पथकाला दिले.सिंधुदुर्ग भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक प्रमोद कांबळे, दुय्यम निरीक्षक डी. बी. कोळी, राजेश पाडाळकर, एस. एस. पाटील, प्रभात सावंत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन कंटेनरची तपासणी केली असता कंटेनरच्या मागील हौद्यात प्लास्टिकचे निळ्या रंगाचे बॅरल आढळले. (प्रतिनिधी)बॅरलची तपासणी : अज्ञातावर गुन्हा दाखलया बॅरलची तपासणी केली असता आतमध्ये बेकायदा स्पिरीटचा साठा आढळला. एकूण ८८ बॅरलमधून १७ हजार २00 लिटर स्पिरीट जप्त करण्यात आले. या स्पिरीटची किंमत ८ लाख २० हजार रुपये आहे. कंटेनरसह २३ लाख २0 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध स्पिरीट वाहतूकप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास प्रभारी निरीक्षक प्रमोद कांबळे करीत आहेत.
स्पिरीटसह २३ लाखांचा मुद्देमाल इन्सुलीत जप्त
By admin | Published: March 13, 2016 1:22 AM