सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन नगरपालिका आणि देवगड नगरपंचायतीसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शुक्रवारच्या शेवटच्या दिवशी एकूण ३२ जणांनी अर्ज मागे घेतल्याने ६८ जागांसाठी एकूण २४८ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत, तर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मालवणमध्ये ७, सावंतवाडीत ६, वेंगुर्लेत ८ असे २१ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. मालवणात युतीविरोधात आघाडी अशी दुरंगी, सावंतवाडीत आघाडी विरोधात शिवसेना आणि भाजप अशी तिरंगी, तर वेंगुर्लेत सेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी चौरंगी, तर देवगडमध्ये शिवसेना-भाजप युती विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शुक्रवार शेवटच्या दिवशी सावंतवाडीत शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे बंडखोर उमेदवार राजन पोकळे यांनी अर्ज मागे घेतला, तर प्रत्येक ठिकाणी काही प्रमाणात बंडखोरांना थंड करण्यात काँग्रेस आणि शिवसेनेला काहीसे यश आले. मालवण पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत केवळ दोनच अर्ज मागे घेण्यात आले. नगराध्यक्ष पदासाठी सात, तर नगरसेवक पदासाठी ५५ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष पदाची निवडणूक बहुरंगी, तर नगरसेवक पदासाठी दुरंगी, तिरंगी, चौरंगी व बहुरंगी लढती होणार आहेत. पक्षातून बंडखोरी केलेल्या उमेदवारांचे बंडाचे निशाण थंड करण्यास अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे सर्वच पक्षात झालेली बंडखोरी व अपक्षांचे आव्हान युती-आघाडीसमोर उभे ठाकले आहे. वेंगुर्ले पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण ११ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. नगराध्यक्ष पदासाठी आठ, तर नगरसेवक पदासाठी ६९ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष पदाची निवडणूक बहुरंगी, तर नगरसेवक पदासाठी चौरंगी व बहुरंगी लढती होणार आहेत. पक्षातून बंडखोरी केलेल्या उमेदवारांचे बंडाचे निशाण थंड करण्यास अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे सर्वच पक्षात झालेली बंडखोरी व अपक्षांचे आव्हान युती-आघाडीसमोर उभे ठाकले आहे. सावंतवाडी पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण १0 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. नगराध्यक्ष पदासाठी सहा, तर नगरसेवक पदासाठी ६७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष पदाची निवडणूक बहुरंगी, तर नगरसेवक पदासाठी तिरंगी लढती होणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी विरोधात शिवसेना आणि भाजप स्वतंत्ररीत्या लढणार आहे. देवगड-जामसंडे नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण ९ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे १७ नगरसेवक पदासाठी ५७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. शिवसेना-भाजप युती विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी तिहेरी लढत येथे होणार असून प्रभाग क्रमांक ८ मध्ये शिवसेना-भाजप यांचे स्वतंत्ररीत्या उमेदवार असल्याने या एका जागेसाठी मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. (प्रतिनिधी) सर्वांनाच बंडखोरीची लागण काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या सर्वच पक्षांना कमी अधिक प्रमाणात बंडखोरीची लागण लागली आहे. शिवसेना आणि काँग्रेसने काही प्रमाणात बंडखोरांना शांत केले असले तरी अजूनही बरेच बंडखोर रिंगणात असल्याने सर्वच ठिकाणच्या लढती अत्यंत लक्षवेधी होणार आहेत.
पालिकांसाठी २४८ उमेदवार रिंगणात
By admin | Published: November 11, 2016 11:03 PM