सावंतवाडी : केंद्र सरकारने आयोजित केलेल्या शहर स्वच्छता स्पर्धेत कोकणातील २५ शहरांनी सहभाग घेतला असून, यातील विजेत्यांचे केंद्र सरकार वर्गीकरण करणार आहे. तर राज्य सरकार या शहरांना खास बक्षीस देऊन गौरविणार आहे. याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तरी शासन त्यावर सकारात्मक असल्याचे विभागीय कोकण उपायुक्त सुधाकर जगताप यांनी सांगितले.
जगताप यांनी सावंतवाडी शहर स्वच्छतेबाबत गुरुवारी नगरसेवकांची खास बैठक येथील लोकमान्य टिळक सभागृहात घेतली. त्यानंतर ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे आदी उपस्थित होते.
यावेळी जगताप म्हणाले, केंद्र सरकारने महाराष्ट्राचा समावेश हा पश्चिम विभागात केला आहे. या विभागात महाराष्ट्राप्रमाणे गोवा व गुजरात तसेच केंद्रशासित प्रदेश आहेत.
या विभागात १०३१ शहरे असून त्यातील पहिल्या २० शहरांना केंद्र सरकार गौरविणार आहे. तर महाराष्ट्र सरकारही केंंद्र सरकारच्या वर्गीकरणाप्रमाणे एक विशेष बक्षीस देणार आहे. या बक्षिसांची रक्कम अद्याप ठरली नाही. बक्षीस देणार यावर शिक्कामोर्तब झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यामध्ये कोकणातील २५ शहरांचा समावेश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शहर स्वच्छतेसाठी एकूण ४ हजार गुणांची ही स्पर्धां असणार आहे. त्यातून वेगवेगळ्या कामांसाठी गुणांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. यात स्वच्छता अॅप तसेच स्वच्छतेबाबतची माहिती तसेच प्रत्यक्षात काम, नागरिकांमधील जनजागृती आदींचा समावेश करण्यात आला आहे.
४ जानेवारीपासून प्रत्यक्ष केंद्रीय समिती प्रत्येक शहरात जाऊन नागरिकांशी चर्चा करणार आहे. तसेच स्वच्छतेबाबतही माहिती घेणार आहे. त्यामुळे ही सर्व कामे लवकरात लवकर करणे गरजेची असल्याचे जगताप यांनी यावेळी स्पष्ट केले.
सर्व नगरपालिकांचे स्वच्छतेत चांगले कामसिंधुदुर्गमध्ये वेंगुर्ले, सावंतवाडी, मालवण व कणकवली या चार शहरांनी भाग घेतला आहे. सर्व नगरपालिका आपल्यापरीने स्वच्छतेत चांगले काम करीत आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती सुरू आहे. सावंतवाडीतही मी स्वत: पालिका अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेतली. त्यानंतर गुरुवारी नगराध्यक्ष व नगरसेवकांसोबत चर्चा केली आहे. सर्वजण स्वच्छतेबाबत गंभीर आहेत.
नागरिकांमध्येही उत्साह निर्माण केला आहे. या सर्व मोहिमेत माहिती तयार करणे तसेच अॅप जास्तीतजास्त नागरिकांपर्यत पोहोचवणे हेच महत्त्वाचे असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले आहे.