अडरे : पावसाळा जवळ आल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून, चिपळूण तालुका आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. आपत्तीप्रवण क्षेत्रात चिपळूण शहरातील १५ ठिकाणे, तर ग्रामीण भागातील १० गावात पाणी भरण्याचा संभाव्य धोका असल्याने येथे आवश्यक ती उपाययोजना करण्यात येणार आहे. चिपळूण शहरातून वाशिष्ठी नदी व शीव नदी वाहाते. शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या नद्यामुळे अतिवृष्टीच्या काळात पूर आल्यास शंकरवाडी नलावडा बंधारा फुटून शंकरवाडी, मुरादपूर, चिंचनाका, भोगाळे या परिसरात पाणी भरते. याच वेळी शीव नदीला पूर आल्याने कापसाळ, कामथे धरणातून ओसंडून वाहणारे पाणी पागमळा भागातून शहरातील बाजारपेठ, भोगाळे भागात भरते. अतिवृष्टीमुळे शहराच्या दक्षिण दिशेला असलेल्या डोंगरावरुन मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. शिवाय वाशिष्ठी नदीला गोवळकोटपासून सुरु होणाऱ्या दाभोळ खाडीपात्रामध्ये भरती ओहोटीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठून राहाते. यामुळे शहरात पूरजन्य स्थिती निर्माण होते. ग्रामीण भागात स्थिती वेगळी आहे. येथील नद्या, नाले दुथडी भरु वाहतात. खेर्डी, मजरेकाशी, मिरजोळी, जुवाड, पेढे-फरशी, चिंचघरी-सतीपूल पिंपळी समर्थनगर, नवीन कोळकेवाडी, दळवटणे, डेरवण, कुटरे बाजारपेठ येथे पाणी भरते. त्यामुळे दळणवळण विस्कळीत होते. अनेक अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागते. शेतीची कामे खोळंबतात. या पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नगर परिषद भोंगा वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देते. पाण्याची पातळी वाढल्यास व शहरात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास तालुक्यात धोका आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. शोध व बचाव गट तयार करण्यात आला आहे. पाण्यात अडकलेल्या गरजू नागरिकांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी नगर परिषदेतर्फे बोटींची व्यवस्था करण्यात येणार आहे. अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास सीआरपीएफ व एनडीआरएफची तुकडी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत बोलवण्यात येईल. विविध संकटांचा सामना करण्यासाठी प्रशासन आपल्या परीने सज्ज आहे. याबाबतचे प्रशिक्षण व बैठका पूर्ण झाल्या आहेत. उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार वृषाली पाटील, निवासी नायब तहसीलदार भारतभूषण रजपूत, गटविकास अधिकारी प्रकाश भोसले व विविध खात्यांचे अधिकारी नियोजन करीत आहे. (वार्ताहर)
२५ ठिकाणे आपत्तीप्रवण क्षेत्रात...
By admin | Published: June 05, 2015 11:47 PM