सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद शाळेतील २७ निमशिक्षकांना शासन निर्णयाप्रमाणे अद्याप प्राथमिक उपशिक्षक म्हणून शिक्षण विभागाने नियुक्ती दिली नसल्याने मंगळवारपासून या सर्व निमशिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे.दरम्यान, आपल्या न्याय मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक वस्तीशाळा शिक्षक संघ शाखा, सिंधुदुर्गचे अध्यक्ष मंगेश खांबळकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील २७ निमशिक्षकांनी बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे.प्राथमिक शाळेतील निमशिक्षकांना प्राथमिक उपशिक्षक म्हणून नियुक्ती देणे बंधनकारक आहे. या मागणीसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक उपोषणेही केली होती. तसेच वारंवार लेखी पत्रव्यवहार करूनही अद्यापपर्यंत २७ निमशिक्षकांना प्राथमिक उपशिक्षक म्हणून १ मार्च २०१४ च्या शासन निर्णयानुसार नियुक्ती दिलेली नाही.गेली १४ वर्षे तुटपुंज्या मानधनावर आजपर्यंत अविरत सेवा बजावली असून २७ मार्च २००८ मध्ये वस्तीशाळा प्राथमिक शाळेमध्ये रुपांतरीत झाल्यानंतर एक पद निमशिक्षक व दुसरे पद शिक्षणसेवकाचे असावे असे शासन निर्णयात नमूद होते असे या संघटनेचे मत आहे. हे शिक्षक निमशिक्षक या पदावर कार्यरत आहोत. अशाप्रकारे कार्यरत असताना १ मार्च २०१४ पासून प्राथमिक उपशिक्षक म्हणून कायम सेवेत समाविष्ट करून घेण्यात यावे असा शासन निर्णय असतानाही निमशिक्षकांना प्राथमिक उपशिक्षक म्हणून नियुक्ती न देता शिक्षक समायोजनाच्या नावाखाली २७ निमशिक्षकांना सेवेतून कमी केले आहे. परंतु त्याबाबत कोणत्याही प्रकारचे लेखी पत्र त्यांना दिलेले नाही. शिक्षण विभागाने या निमशिक्षकांना वाऱ्यावर सोडले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.वस्तीशाळा निमशिक्षक संघाचे म्हणणे आहे की, सातारा, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, लातूर, धुळे येथे १ मार्च २०१४ च्या शासन निर्णय आदेशाची अंमलबजावणी सुरु करून वरील जिल्ह्यातील निमशिक्षकांना प्राथमिक उपशिक्षक म्हणून नियुक्ती आदेश दिलेले आहेत. अतिरिक्त शिक्षक व निमशिक्षकांचा संबंध तेथे जोडलेला नाही. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही या २७ निमशिक्षकांना प्राथमिक उपशिक्षक म्हणून नियुक्ती द्यावी, अशी मागणी निमशिक्षकांनी केली आहे. (प्रतिनिधी)
२७ निमशिक्षकांचे उपोषण सुरू
By admin | Published: July 08, 2014 10:57 PM