कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, मालवण आणि वेंगुर्ले नगरपालिका तसेच नव्याने निर्माण झालेल्या देवगड-जामसंडे नगरपंचायतीसाठी २७ नोव्हेंबरला निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी करण्यात आली. दाखल झालेल्या ३३९ उमेदवारी अर्जापैकी ३११ अर्ज वैध ठरले आहेत, तर २८ अर्ज अवैध ठरले आहेत. ११ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील या निवडणुकीचे नेमके चित्र ११ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे. मालवण नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक विभागाकडे दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर नगराध्यक्षपदाच्या दहाही उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर नगरसेवकपदासाठी दाखल केलेल्या ६१ अर्जांपैकी तीन अर्ज अधिकाऱ्यांनी अवैध ठरविले आहेत. त्यामुळे आता नगराध्यक्षांसह नगरसेवकपदाच्या उमेदवारांची संख्या ६८ इतकी झाली आहे. सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीकरिता १७ जागांसाठी दाखल करण्यात आलेल्या १०६ अर्जांपैकी २० अर्ज छाननी दरम्यान अवैध ठरले आहेत. यामध्ये चार विद्यमान नगरसेविकांचा पत्ता गूल झाला असून, ८६ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. तर प्रभाग आठमधील उमेदवार इस्टाबेला पिंटो यांच्या अर्जावर सही नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आल्याने त्यांनी जिल्हा न्यायालयात अपील केले. देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या उमेदवारी अर्जांच्या छाननीच्या वेळी एकूण ७६ अर्जांपैकी ५ उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत, तर ७१ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. (प्रतिनिधी) वेंगुर्ले नगरपरिषदेत सर्वच अर्ज वैध वेंगुर्ले नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेले सर्वच्या सर्व ८६ अर्ज वैध ठरले आहेत. त्यापैकी ७५ नगरसेवकपदासाठी, तर ११ नगराध्यक्षपदांसाठी आहेत. नगराध्यक्षपदाचे उमेदवार शिवसेनेचे रमण वायंगणकर व भाजपचे राजन गिरप यांनी परस्पर हरकती घेतल्या.
सिंधुदुर्गातील नगरपालिका निवडणुकीसाठी २८ अर्ज अवैध
By admin | Published: November 02, 2016 11:20 PM