कणकवली : कणकवली तालुक्यातील 58 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच निवडीतील नवनिर्वाचित आपला पाच वर्षाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. यात 56 नवनिर्वाचित सरपंच 29 डिसेंबर रोजी तर जानवली आणि कोंडये सरपंच 30 डिसेंबरला पदभार स्वीकारणार आहेत.त्याचबरोबर थेट निवडून आलेल्या सरपंचाच्या अध्यक्षतेखाली सचिव ग्रामसेवक हे नवनिर्वाचित सदस्यांची पहिली सभा घेवून उपसरपंचाची निवड करणार आहेत.मुदत संपलेल्या तालुक्यातील 63 पैकी 58 ग्रामपंचायतीच्या निवडणुका 16 ऑक्टोबरला होऊन 17 ऑक्टोबरला मतमोजणी झाली होती. यात तालुक्यातील 14 सरपंच आणि 9 ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या होत्या. थेट सरपंच पदासाठी 44 तर 49 ग्रामपंचायतीमध्ये मतदान प्रक्रिया राबविण्यात आली होती.नवनिर्वाचित सरपंचांमध्ये असलदे येथील उपसरपंच असलेल्या गुरुप्रसाद वायंगणकर यांचा तसेच वाघेरीचे सरपंच असलेल्या संतोष राणे यांचा समावेश आहे. संतोष राणे पुन्हा एकदा वाघेरीच्या सरपंच पदी विराजमान होणार आहेत.या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक विद्यमान सरपंचाना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे नवीन उमेदवारांना सरपंच पदी विराजमान होण्याची संधी मिळाली आहे.या ग्रामपंचायत निवडणुकीत नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने समर्थ विकास पॅनेल स्थापन करून कणकवली तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. त्यापाठोपाठ शिवसेना , भाजपनेही काही ठिकाणी स्वतंत्र तर काही ठिकाणी गाव पॅनेलच्या माध्यमातून ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविली आहे.तालुक्यात 58 पैकी 40 पेक्षा अधिक ग्रामपंचायतीवर समर्थ विकास पॅनेलचे वर्चस्व असल्याचा दावा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. 29 डिसेंबर रोजी होणाऱ्या सभेचे अध्यक्ष सरपंच हे असणार आहेत.
उपसरपंच निवड करण्यात येणार असून या निवडीसाठी इच्छुकांमध्ये मोठी स्पर्धा रहाणार आहे. संबधित ग्रामपंचायतीत निवडून आलेले पॅनेल कोणाला मदत करणार यावरहि उपसरपंचांची निवड अवलंबून आहे. त्यामुळे सध्या तरी कणकवली तालुक्यातील अंतर्गत राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.