कणकवली : गगनबावडा येथील डी.वाय. पाटील साखर कारखान्याचा तेरावा गाळप हंगाम सुरू झाला असून यावर्षी १ लाख मेट्रिक टन ऊस गाळप सिंधुदुर्गातून अपेक्षित आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बॅँकेने २०१५ या हंगामाकरिता ऊस पिकासाठी ३ कोटी २० लाखाची कर्ज मंजुरी दिली आहे. ऊस पिक तोडणीसाठी स्थानिक मजुरांची टोळी तयार करण्याचे प्रयत्न असून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा बॅँक कटीबद्ध असल्याची ग्वाही बॅँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली आहे. गगनबावडा येथील डी. वाय. पाटील साखर काखान्याचा गाळप हंगाम गेल्या महिन्यापासून सुरू झाला आहे. जिल्ह्यात यावेळी १ हजार ६१८ हेक्टर ऊस लागवडीखालील क्षेत्राची नोंद झाली आहे. गतवर्षी जिल्ह्यातून ८७ हजार ७२१ मेट्रिक टन ऊस उपलब्ध झाला होता. त्यापोटी शेतकऱ्यांना २० कोटी ५२ लाख ऊस बिलाची रक्कम अदा करण्यात आली आहे. गगनबावडा साखर कारखान्याचे २०१५-१६ मध्ये ४.७० मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. १२.२० टक्के उताऱ्याने ५.७३ क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन अपेक्षित आहे. या गळीत हंगामासाठी कार्यक्षेत्रातील ४३३१.५४ हेक्टर व कार्यक्षेत्राबाहेरील ४२९९.५४ हेक्टर असे मिळून ८६३१.८ क्षेत्रामध्ये ऊस लागवडीची नोंद झाली आहे. तारण नसल्यास हमीपत्रावर कर्जपीक कर्ज पुरवठा हा क्षेत्रावर कर्ज बोजा नोंद करून पीक तारण घेऊन केला जातो. शेतकऱ्याकडे कर्जासाठी तारण क्षेत्र नसेल तर अशा शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या बाबतीत कारखान्याचा लागन दाखला व कारखान्याच्या हमीपत्रावर १ लाखापर्यंतचे कर्ज बॅँकेतर्फे मंजूर केले जात आहे. कर्ज मंजुरी ही क्षेत्राच्या प्रमाणानुसार दिली जाणार आहे. जिल्ह्यातील नवीन शेतकऱ्यांना ऊस लागवड करायची असल्यास त्यांनी बॅँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन सतीश सावंत यांनी केले आहे. (प्रतिनिधी)ऊस तोडणीचे नियोजन : वाहनधारकांशी करारगेल्यावर्षी एफआरपी प्रमाण २३४० रूपये प्रमाणे एकूण १०५.५४ कोटी रक्कम कारखान्याने शेतकऱ्यांना अदा केली. त्यापैकी २० कोटी ५२ लाख सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना अदा करण्यात आले. कणकवली, वैभववाडी तालुक्यातील ऊस तोडणीचे नियोजन करण्यात आले आहे. ऊस तोडणी पाळीपत्रक तालुक्यातील विकास संस्था कार्यालयात उपलब्ध आहेत. ४२७ वाहनधारकांशी करार करण्यात आले असून टोळ्यांमार्फत हंगामात प्रतिदिन ४ हजार टन ऊस तोडणी होणार आहे. पाळीपत्रकाबाबत तक्रार असल्यास बॅँकेच्या प्रधान कार्यालयाकडे अथवा कारखान्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन सावंत यांनी केले आहे.
उसाला ३ कोटींची कर्ज मंजुरी
By admin | Published: November 04, 2015 10:38 PM