कुडाळ : कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे २४ तास नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून कुडाळातील महत्त्वाच्या ठिकाणी ३ नियंत्रण पथकाची ही नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती तहसील प्रशासनाकडून देण्यात आली.
कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने कुडाळ तहसीलदार कार्यालयात झालेल्या बैठकीत तहसीलदार रवींद्र नाचणकर यांनी सर्व यंत्रणा प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना सर्व विभागाला दिल्या होत्या. तसेच सर्व शासकीय कार्यालयांमध्ये येणारे कर्मचारी नागरिक यांनी हात धुवुनच कार्यालयात प्रवेश करावे यासाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करण्याचे आदेश तहसीलदार नाचणकर यांनी दिले होते. दरम्यान बुधवारी कुडाळ तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर हात धुण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते.
तर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता सर्व नियोजनासाठी कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे २४ तास नियंत्रण कक्ष गुरुवारपासून सुरुवात करण्यात आला आहे. तसेच कुडाळ एसटी स्टँड, रेल्वे स्थानक व इतर एका ठिकाणी अशी तीन पथके नियुक्त करण्यात आली आहेत.