तळेरे : कणकवली तालुक्यातील ओटव व करूळ या दोन ठिकाणी रविवारी मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात सुमारे ३0 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती चांगली आहे.ओटव येथे धरण झाल्यानंतर त्यामध्ये बाधित झालेल्या श्री पावणादेवी मंदिराची पुन्हा उभारणी करण्यात आली आहे. या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास होमहवन करताना समिधा, तूप सोडल्यावर तिथे मोठा धूर निर्माण झाला. त्यावेळी झालेल्या धुराची झळ बाजूला असणाऱ्या हेळ्याच्या झाडावरील मधमाशांच्या पोळ्याला लागली. यामुळे मधमाशा बिथरल्या. त्यांनी तिथे उपस्थित दोनशे ते अडीचशे नागरिकांवर हल्ला केला. यामुळे एकच पळापळ झाली. मात्र, वृद्ध व्यक्ती तसेच अन्य काहींना तेथून पळणे शक्य न झालेल्या सुमारे ३० जणांचा मधमाशांनी चावा घेतला. यातील अनेकांचे तोंड, हात सुजले. जखमींपैकी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमेश आत्माराम ओटवकर (३४), हेमंत रामचंद्र ओटवकर (५२), गौरेश अभय ओटवकर (१७), संतोष मधुकर सावंत (३२, सर्व राहणार ओटव) यांनी उपचार घेतले. त्यांना आता घरी पाठविण्यात आले आहे. तर दोन खासगी रुग्णालयातही २६ जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.करूळ येथील तिघांवर मधमाशांचा हल्लाकरूळ कदमवाडी येथील आनंद कासले यांच्या घराच्या परिसरात ते रविवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास कुटुंबीयांसह साफसफाई करीत होते. पालापाचोळा जाळण्यासाठी लावलेल्या आगीच्या धुरामुळे तेथील झाडावर असलेल्या मधमाशांनी त्यांच्यासह तिघांवर अचानक हल्ला केला.या घटनेत आनंद सदाशिव कासले (४२), पूर्वा आनंद कासले (३०), ऋणाली चिंतामणी कासले (२८, सर्व राहणार करूळ, कदमवाडी) हे जखमी झाले आहेत. त्या तिघांना तत्काळ उपचारासाठी कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता ठिक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
होमहवनाच्या धुराने मधमाशांचा हल्ला, ३० जण जखमी; कणकवली तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2023 12:08 PM