दोडामार्ग : झोळंबे येथील पाषाणमूूर्तींची विटंबना केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या नातेवाईकांनी काही ग्रामस्थांबाबत दिलेली तक्रार ही पूर्णपणे खोटी असल्याने ती दाखल करून घेऊ नये, या मागणीसाठी सोमवारी झोळंबेतील तीनशेहून अधिक ग्रामस्थ व महिलांनी तहसील व पोलिस कार्यालयावर धडक दिली. जर ही तक्रार दाखल करून ग्रामस्थांना अटक झाली, तर उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला. झोळंबे येथे २८ मार्च रोजी ऐन शिमगोत्सवात मंदिराबाहेरील पाषाणमूर्तींची विटंबना करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती. मात्र, याच दरम्यान संशयित आरोपींच्या नातेवाईकांनी गावातीलच बाळकृष्ण गवस, सचिन गवस, महेश गवस, योगेश गवस, रामा गवस, जगदीश गवस, विशाल गवस, तुकाराम गवस, प्रकाश गवस, पांडुरंग गवस, प्रभाकर गवस, सुखाजी गवस, सतीश गवस, संतोष गवस, विजय देसाई, ज्ञानेश्वर गवस आदी ग्रामस्थांबाबतही तक्रार दिली होती. मात्र, ही तक्रार खोटी असल्याचे मत झोळंबे ग्रामस्थांचे आहे. हे ग्रामस्थ गावातील प्रत्येक कार्यात सहभागी असतात. परिणामी त्यांच्या विरोधात केलेली तक्रार पूर्णत: चुकीची असून, ती दाखल करून घेऊ नये, या मागणीसाठी सोमवारी तीनशेहून अधिक ग्रामस्थांनी दोडामार्ग तहसील व पोलिस कार्यालयावर धडक दिली. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. जर पोलिसांनी खोट्या तक्रारी दाखल करून घेतल्या व ग्रामस्थांना अटक केली, तर उपोषणास बसण्याचा इशारा दिला. ग्रामस्थांची मोठ्या संख्येने असलेली उपस्थिती लक्षात घेऊन प्रभारी तहसीलदार टी. जी. केरकर, नायब तहसीलदार श्रीधर खाली पिल्ली, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पवार आदींनी ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप नाईक, सेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी उपस्थित होते. यावेळी केरकर व पवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन दिले.(प्रतिनिधी)
‘तहसील’मध्ये ३00 ग्रामस्थांची धडक
By admin | Published: April 05, 2016 12:55 AM