अयोध्याप्रसाद गावकर ।
देवगड : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर विधिमंडळाच्या पहिल्याच अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकºयांना २ लाख रुपयापर्यंत कर्जमाफीची घोषणा केली आहे. यामध्ये शेतकºयांचा सातबारा कोरा होत नसला तरी शेतक-यांची २ लाखापर्यंत होणारी कर्जमाफी ही त्यांना दिलासा देणारी आहे. या घोषणेमुळे देवगड तालुक्यात सुमारे ९ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा फायदा होणार आहे. तालुक्यात ३७ कोटी ७५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होऊ शकते.
देवगड तालुक्यात विशेषत: आंबा पिकासाठी कर्जे जास्त प्रमाणात घेण्यात आली आहेत. बँक आॅफ इंडिया, महाराष्ट्र बँक, स्टेट बँक व जिल्हा बँक या बँकांमधून येथील शेतक-यांनी सर्वाधिक प्रमाणात कर्जे घेतली आहेत. तसेच विविध कार्यकारी सोसायट्यांमधूनही शेतकºयांनी २५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत शेतीकर्ज व आंबा पीक कर्ज घेतली आहेत.
विशेषत: विजयदुर्ग, पडेल, वाडा, देवगड, तळेबाजार, मिठबांव, शिरगांव या बँक आॅफ इंडियाच्या शाखांमधून सुमारे चार हजार शेतकºयांनी आंबा पीक कर्जे घेतली आहेत.
विशेषत: एक लाखापर्यंत सुमारे तीन हजार दोनशे शेतकºयांनी कर्जे घेतली आहेत तर एक लाख ते एक लाखाच्यावरती ८०० हून अधिक शेतक-यांचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या तालुक्यातील विविध शाखांमधूनही बहुतांश शेतकºयांनी आंबा पीक व शेतीसाठी कर्जे घेतली आहेत. या बँकेच्या शाखांमधून ५० हजारापर्यंत बिनव्याजी कर्जे अनेक शेतक-यांनी घेतली आहेत.
तालुक्यातील ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज घेतलेल्या शेतक-यांची संख्या सुमारे ५ हजार आहे तर एक लाखापर्यंत कर्ज घेतलेल्या शेतक-यांची संख्या सुमारे २ हजार इतकी आहे.
तर दोन लाखांहून अधिक कर्ज घेणा-या शेतक-यांची संख्या दोन हजारांहून जास्त आहे. देवगड तालुक्यातील सुमारे १८ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरती आंबा बागायतीची नोंद आहे. यामधील १५ हजारांहून अधिक शेतकरी, बागायतदार आंबा व्यवसाय करतात.
- आंबा व्यवसायावर देवगडची आर्थिक नाडी
सर्वाधिक कृषी कर्जाचे वितरण देवगड तालुक्यात केले जाते. तालुक्यामध्ये सर्वाधिक आंबा बागायतदार असून हे आंबा बागायतदार पीक कर्ज दरवर्षी घेत असतात. इतर तालुक्यांमध्ये मत्स्य व लघु उद्योगावरती कर्ज जास्त प्रमाणात असल्याचे सांगण्यात येत आहे.तसेच देवगड तालुका हा आंबा तसेच मत्स्य व्यवसायावरती विशेषत: अवलंबून आहे. या दोन्ही व्यवसायांवरती तालुक्याची आर्थिक नाडी अवलंबून आहे.