कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणात उन्हाळी सुट्टीत अनेक नागरिक मुंबई तसेच अन्य भागातून दाखल होत असतात. त्यांच्या सोयीसाठी एसटीच्या सिंधुदुर्ग विभागातर्फे १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत जादा ३१ गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्याबाबतचे नियोजन करण्यात आले असून या जादा गाड्यांमुळे एसटीच्या जिल्हाअंतर्गत प्रवासी वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही अशी माहिती एसटीचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांनी दिली. कणकवली येथील एसटीच्या विभागीय कार्यालयात प्रसिद्धिमाध्यमांशी मंगळवारी त्यांनी संवाद साधला. यावेळी गौतमी कुबडे, सुवर्णा दळवी, अक्षय केंकरे आदी अधिकारी उपस्थित होते. पाटील पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग विभागाकडून मालवण मुंबई, विजयदुर्ग मुंबई, देवगड नालासोपारा, देवगड बोरिवली या चार नियमित गाड्या सुरू आहेत. त्याचबरोबर प्रवाशांच्या उपलब्धतेनुसार आणखीन ३१ गाड्या नव्याने सुरू करण्यात येणार आहेत. त्यामध्ये बोरिवली, आंबेजोगाई, तुळजापूर, पुणे, रत्नागिरी आदी भागात जाणाऱ्या गाड्यांचा समावेश असेल. त्यामुळे जादा व नियमित ३५ गाड्यांमधून प्रवाशांना वाहतुकीची सुविधा पुरविण्यात येणार आहे. या गाड्यांचे आरक्षण सुरू झाले आहे. या गाड्याना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. एसटीकडून ज्येष्ठ नागरिक तसेच महिला व समाजातील अन्य घटकांना प्रवासी भाड्यामध्ये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद एसटीच्या सेवेला चांगला मिळत आहे. कोविड काळात बंद झालेल्या ग्रामीण भागातील गाड्या टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. रेल्वेस्टेशनवरून प्रवाशांना बसस्थानकात येण्यासाठी गाड्यांची सोय करण्यात येत आहे.त्याचबरोबर सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असून प्रवाशांच्या मागणीनुसार पर्यटन पॅकेज टूर सुरू करण्यात येणार आहेत. पर्यटन स्थळांची माहिती पर्यटकांना सांगण्यासाठी प्रशिक्षित व्यावसायिक पर्यटक गाईडची मदत घेण्यात येईल. मिडी बस दाखल होईपर्यंत सध्या उपलब्ध असलेल्या गाड्यांच्या माध्यमातून ही सुविधा पुरविण्याचा आमचा प्रयत्न राहील. त्याचप्रमाणे पणजी -पुणे,पणजी-निगडी अशा थेट गाड्याही सुरू करण्यात येणार आहेत.त्याचा लाभ प्रवाशांनी घ्यावा.असे आवाहनही अभिजित पाटील यांनी यावेळी केले.आतापर्यंत ९० गाड्या फुल्ल!२२ एप्रिल ते ९ मे या कालावधीत मुंबई तसेच इतर भागातून सिंधुदुर्गात येणाऱ्या नियमित व जादा ९० गाड्यांचे आरक्षण आतापर्यंत फुल्ल झाले आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार या गाड्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. तसेच मुंबई वरून येणाऱ्या या गाड्यांपैकी काही गाड्या परतीचा प्रवास करताना कोल्हापूर,पुणे मार्गे मुंबईला जातील. असेही अभिजित पाटील यांनी सांगितले.
उन्हाळी सुट्टीसाठी सिंधुदुर्ग विभागाकडून एसटीच्या ३१ जादा गाड्या सोडणार; अभिजित पाटील यांची माहिती
By सुधीर राणे | Published: April 11, 2023 1:20 PM