बांदा : राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या भरारी पथकाने मंगळवारी पहाटेच्या सुमारास बेकायदा गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर बांदा-सटमटवाडी व सावंतवाडी-मोरडोंगरी येथे कारवाई करीत तब्बल २३ लाख ५८ हजार रुपये किमतीच्या दारूसह एकूण ३१ लाख ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सावंतवाडी येथील कारवाईतील वाहनचालक फरार झाला. मात्र, बांदा येथे केलेल्या कारवाईत चालक काशिनाथ रमेश चव्हाण (वय २७, रा. तळगाव, ता. मालवण) याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.उत्पादन खात्याने दोन्ही कारवाईत एकूण ५२७ गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स जप्त केले. याबाबतची अधिक माहिती अशी की, गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची खबर उत्पादन शुल्क खात्याला मिळाली होती. सावंतवाडी-मोरडोंगरी येथील गणेशनगर येथे उत्पादन शुल्क खात्याचे पथक गस्त घालत असताना कारवाईच्या भीतीने चालक रस्त्यालगतच महिंद्रा कंपनीचा जिनिओ टेम्पो (एमएच 0७ पी २१८६) उभा करून पळून गेला. या गाडीच्या हौद्याची तपासणी केली असता आतमध्ये गोवा बनावटीच्या दारूचे बेकायदा लपविलेले बॉक्स आढळले. याठिकाणी पथकाने लगतच्या परिसरात चालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत चालकाने तेथून पयालन केले. उत्पादन खात्याच्या पथकाने १0 लाख ५६ हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू व तीन लाख ५0 हजार रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण १४ लाख सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत अज्ञात वाहनचालकाविरोधात बेकायदा दारू वाहतुकीचा गुन्हा दाखल केला. ही कारवाई मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.दुसरी कारवाई बांदा-सटमटवाडी येथे महामार्गावर मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. गोव्याहून बांद्याच्या दिशेने येणारा पिकअप टेम्पो (एमएच 0७ पी १६१५) तपासणीसाठी थांबविण्याचा इशारा पथकाकडून करण्यात आला. मात्र, चालकाने वाहन न थांबविता सावंतवाडीच्या दिशेने भरधाव वेगात धूम ठोकली. उत्पादन खात्याच्या पथकाने पाठलाग करून वाहनाला सटमटवाडी येथे महामार्गावर पकडले. यावेळी टेम्पोच्या हौद्याची तपासणी केली असता आतमध्ये नारळाची झावळे ठेवली होती. या झावळांच्या खाली गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स लपविण्यात आले होते. यामध्ये ३0७ बॉक्स आढळून आले. यामध्ये १३ लाख दोन हजार रुपये किमतीची दारू व चार लाख ५0 हजार रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण १७ लाख ५२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. टेम्पो चालक काशिनाथ चव्हाण याच्यावर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई केली.उत्पादन खात्याच्या पथकाने एकाच वेळी दोन वाहनांवर कारवाई करीत एकूण ३१ लाख ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप कालवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक शंकर जाधव, निरीक्षक अमित पाडाळकर, सहायक दुय्यम निरीक्षक चंद्रकांत कदम, हेमंत वस्त, रमाकांत ठाकूर, मानस पवार, एस. जी. मुपडे, प्रसाद माळी, दीपक वायदंडे यांनी केली. अधिक तपास शंकर जाधव व अमित पाडाळकर करीत आहेत. (प्रतिनिधी)
बेकायदा दारूसह ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त
By admin | Published: February 28, 2017 11:36 PM