कणकवली: शेअर्स खरेदी करून तुम्हाला जादा फायदा मिळवून देतो असे सांगत धनादेशाद्वारे शहरातील दोन व्यक्तींकडून पैसे घेतले.मात्र, कोणत्याही प्रकारचे शेअर्स खरेदी न करता बनावट मनी कंट्रोल अॅप डाऊनलोड करून देवून बनावट स्टेटमेंट देत विश्वास संपादन करत डॉ.सुर्यकांत नारायण तायशेटे (७५) आणि त्यांची पत्नी शुभांगी तायशेटे (दोन्ही रा. कणकवली) यांची एकूण ३२ लाख ९४ हजार ९३४ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी त्यांच्या तक्रारीवरून एका महिलेसह तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेबाबत कणकवली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार विवेक विजय पार्टे, वेदिका वैभव पार्टे (दोन्ही रा. शिरोडा नाका , सावंतवाडी) आणि प्रथमेश श्रीकांत राणे (रा. इन्सूली,सावंतवाडी) या तीन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर हा फसवणुकीचा गुन्हा १९ जुलै २०२२ ते २७ डिसेंबर २०२३ या दरम्यानच्या कालावधीत घडला आहे. संशयितांनी एकमेकांच्या संगनमताने तक्रारदार सुर्यकांत तायशेटे यांना तुमच्या नावे शेअर्स खरेदी करून तुम्हाला जास्त फायदा मिळवून देतो असे सांगितले. तसेच तक्रारदार यांच्याकडून वेळोवेळी धनादेशाद्वारे रकमा घेवून कोणत्याही प्रकारचे शेअर्स त्यांच्या नावे खरेदी केले नाहीत. तक्रारदार यांना बनावट मनी कंट्रोल अॅप डाऊनलोड करून देवून बनावट स्टेटमेंट देत त्यांचा विश्वास संपादन केला. यामध्ये सुर्यकांत तायशेटे यांची २० लाख १९ हजार ९३४ रुपये आणि पत्नी शुभांगी तायशेटे यांची १२ लाख ७५ हजार रुपये अशी एकूण ३२ लाख ९४ हजार ९३४ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सुर्यकांत तायशेटे यांच्या तक्रारीवरून संशयित विवेक पार्टे, वेदिका पार्टे आणि प्रथमेश राणे यांच्याविरुद्ध कणकवली पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. यापुढील अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शरद देठे करत आहेत.
Sindhudurg: बनावट मनी कंट्रोल अॅप देत ३३ लाखांची फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 1:18 PM