सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यातील २२५ अपंग लाभार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार रुपये प्रमाणे ३३ लाख ७५ हजार एवढे व्यवसायासाठी अर्थसहाय्य पुरविण्यात आले असल्याची माहिती समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी दिली. समाजकल्याण विभागामार्फत सर्व जाती धर्मांच्या अपंग लाभार्थ्यांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जातो. या योजनांमध्ये अपंगाना व्यवसायासाठी अर्थसहाय्य देणे, मोफत झेरॉक्स मशिन पुरविणे, बीज भांडवल योजना, अस्थीव्यंग मुलांना वसतीगृहाची मोफत सुविधा, अपंग दाम्पत्याला अर्थसहाय्य याही योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा जास्तीत जास्त अपंग लाभार्थ्यांनी लाभ घेऊन आपला उत्कर्ष साधावा, असे आवाहनही सभापती अंकुश जाधव यांनी केले आहे. अपंगांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य देण्याची तरतूद या योजनांमध्ये असून प्रत्येक लाभार्थ्याला १५ हजारांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. त्यासाठी जिल्हा परिषद अनुदानातून १५ लाखाची तरतूद करण्यात आली आहे. ही योजना सर्व जाती धर्मांच्या अपंग बांधवांसाठी खुली असून गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यातील २२५ लाभार्थ्यांना ३३ लाख ७५ हजार एवढे अर्थसहाय्य करण्यात आले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींचे वार्षिक उत्पन्न ४० हजार पेक्षा कमी असावे, तसेच लाभार्थी ४० टक्केहून जादा अपंगत्व असणे आवश्यक आहे. व्यवसाय करत असल्याबाबतचा सरपंच किंवा ग्रामसेवकाचा दाखला आवश्यक आहे. स्वयंरोजगारासाठी अपंगाना १०० टक्के अनुदानावर झेरॉक्स मशिन पुरविणे या योजनेसाठी जिल्हा परिषद निधीतून २० लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी लाभार्थ्याकडे व्यवसायासाठी विजेची सोय असलेली जागा उपलब्ध असावी. बीज भांडवल योजनेंतर्गत अपंगांना अर्थसहाय्य पुरविण्यात येत असून ४० टक्के पेक्षा जादा अपंगत्व असलेल्या १८ ते ५० वयोगटातील लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घेता येईल. १ लाखपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या अपंग व्यक्तींना व्यवसायाचा आराखडा दिल्यानुसार प्रकल्प खर्चाच्या २० टक्के किंवा ३० हजारपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. कर्णबधीर, मुखबधीर विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय निवासी मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शिरोज येथील माऊली कर्णबधीर विद्यालयामध्ये या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते.तरी जिल्ह्यातील अपंग बांधव तसेच विद्यार्थ्यांनी जिल्हापरिषदेच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी समाजकल्याण विभागाकडे प्रस्ताव सादर करावा. अधिक माहितीसाठी या विभागाशी संपर्क साधावा. (प्रतिनिधी) अस्थिव्यंग विद्यार्थ्यांसाठी निवासाची सोय अंध मुलांसाठी कुडाळ एम. आय. डी. सी येथील शासकीय अंधशाळेत मोफत शिक्षण देण्यात येते. तसेच त्याच ठिकाणी अस्थिव्यंग विद्यार्थ्यांना निवासाची सोय व्हावी यासाठी वसतिगृहाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे, अशीही माहीती अंकुश जाधव यांनी दिली.
३४ लाखांचे अर्थसहाय्य
By admin | Published: September 19, 2015 11:40 PM