बांदा : आरोसबाग तेरेखोल नदीपात्रात नागरिकांची गेली ३५ वर्षे मागणी असलेल्या पुलाचे स्वप्न अखेर सत्यात उतरले. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्यामकांत काणेकर यांच्या हस्ते या पुलाचा अनौपचारिक शुभारंभ करण्यात आला. हा पूल पूर्ण व्हावा, यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. अखेर पूल पूर्ण झाल्याने येथील नागरिकांचा होडीचा जीवघेणा प्रवास यावर्षीपासून थांबला आहे.
समस्त आरोसबागवासीय आबालवृध्दांनी फटाक्यांची आतषबाजी व मिठाई वाटत पूल स्वप्नपूर्तीचा आनंद साजरा केला.आरोसबागवासीयांनी पुलाच्या पूर्ततेसाठी कित्येक आंदोलने, उपोषणे केली. पुलाचे स्वप्न भाजपच पूर्ण करू शकते, असा ठाम विश्वास आरोसबागवासीयांना होता. हा विश्वास भाजपने सार्थ करुन दाखवताना पुलाचे स्वप्न सत्यात उतरवून दाखवले.शेर्ले गावची आरोसबाग वाडी पूर्णपणे बांदा शहरावर अवलंबून आहे. शिक्षण, आरोग्य, बाजार यासाठी येथील ग्रामस्थांना दररोज बांदा शहरात यावे लागते. त्यासाठी होडी हाच एकमेव पर्याय होता. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २३ मे १९९९ रोजी या पुलाचे भूमिपूजन करण्यात आले होते. या पुलाचा आराखडादेखील तयार करण्यात आला होता.
युती शासन गेल्यानंतर आघाडी शासनाच्या काळात या पुलाचा प्रश्न रखडला. आरोसबाग ग्रामस्थांनी पुलाच्या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू केला. पुलाच्या प्रत्यक्ष कामाला दोन वर्षांपूर्वी प्रारंभ करण्यात आला. आता काम पूर्ण झाल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान पसरले आहे.पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्णल्ल कोरोना संकटकाळात पुलाचे काम थांबले होते. मात्र, यावर्षी पुलाचे उर्वरित काम युद्धपातळीवर पावसाळ्याच्या तोंडावर पूर्ण करण्यात आले. या पुलाचे उद्घाटन भाजप प्रांतिक सदस्य श्यामकांत काणेकर यांच्या हस्ते करण्यात आले.ल्ल जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, उपसभापती शीतल राऊळ, बांदा सरपंच अक्रम खान, माजी सरपंच मंदार कल्याणकर, संजय चांदेकर आदींसह आरोसबागवाडीतील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या अनेक दशकांपासून पावसाळ्यात होडीतून करायला लागणारा प्रवास आता वाचणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.