बांदा : बांदा पोलिसांनी विविध कारवाईत जप्त केलेल्या तीन स्पिरीटच्या टँकरची शुक्रवारी सकाळी पोलीस ठाण्याच्या आवारात लिलाव प्रक्रिया घेण्यात आली. तिन्ही टँकरमधील सुमारे ३९ हजार ६०० लिटर स्पिरीट हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथील मे. सर्वोत्तम ऊर्जा प्रा. लि. कंपनीचे दीपक माणिकराव पाटील यांनी सर्वाधिक बोली लावून विकत घेतले.गोव्यातून महाराष्ट्रात बेकायदा स्पिरीटची वाहतुक करताना बांदा पोलिसांनी तिन स्पिरीटच्या टँकरवर कारवाई केली होती. हे स्पिरीटचे टँकर बांदा पोलिस स्थानक आवारात कोणत्याही सुरक्षेविना ठेवण्यात आले होते. या स्पिरीटच्या टँकरचा लिलाव करावा अशी मागणी होत होती. बांदा पोलिसांनी विविध कारवाईत १५ हजार ६०० लिटर, १४ हजार लिटर व १0 हजार लिटर अशा तीन स्पिरीटच्या बेकायदा टँकरवर कारवाई केली होती.बांदा पोलिसांनी याबाबत ९ फेबु्रवारी २०१२ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना लिलावाबाबत लेखी पत्र दिले. जिल्हाधिकारी यांनी ७ मे २०१५ रोजी या स्पिरीटचा लिलाव करण्याचा आदेश दिला. लिलावाची प्रक्रिया राबविण्यासाठी बांदा पोलिसांनी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाला पत्र दिले. त्यानुसार जाहिरात प्रसिद्ध करुन शुक्रवारी लिलावाची तारीख निश्चित करण्यात आली.स्पिरीटच्या खरेदीसाठी ४ लिलावधारकांनी अर्ज केला होता. मात्र आज प्रत्यक्षात तीन लिलावधारक हजर होते. मे. ओयलिस अल्कोहोल प्रा. लि. तासवडे, कराड यांच्यावतीने महेश धोंडीराज भोसले, मे. श्रीराम ट्रेनिंग अॅण्ड मॅन्युफ्कॅचरिंग कंपनी लिमिटेड हातकणंगले, कोल्हापूर यांच्यावतीने अभिजीत मोहनराव पाटिल व मे. सवौत्तम ऊर्जा प्रा. लि. हातकणंगले, कोल्हापूर यांच्यावतीने दीपक माणिकराव पाटील यांनी लिलाव प्र्रक्रियेत भाग घेतला.प्रति लिटर १८ रुपये दराने बोलीस सुरुवात करण्यात आली. त्यानंतर दिपक पाटील यांनी २२ रुपये ५० पैसे प्रति लिटर बोली लावली. ही बोली सर्वाधिक ठरली. यावेळी दीपक पाटील यांचेकडून २५ हजार रुपये अनामत रक्कम भरुन घेण्यात आली. येत्या १५ दिवसांत प्रत्यक्ष स्पिरीटचा साठा किती आहे याची मोजणी करुन स्पिरीटची विक्रि करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुठे यांनी सांगितले. यावेळी उपअधीक्षक अनंत आरोसकर, उत्पादन शुल्क खात्याचे इन्सुली तपासणी नाक्याचे दुय्यम निरिक्षक अमित पाडाळकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
३९ हजार ६00 लिटर स्पिरीटचा लिलाव
By admin | Published: June 12, 2015 10:49 PM