चिपळूण : कोकण रेल्वे कोकणातून जात असली तरी कोकणातील प्रवाशांना तिचा फारसा लाभ होत नाही. सातत्याने मागणी करुनही गाड्यांची संख्याही वाढवली जात नाही. शिवाय एक्सप्रेस गाड्यांना थांबाही दिला जात नाही. त्यामुळे रत्नागिरीसाठी नवीन ४ गाड्या सुरु कराव्यात, अशी मागणी हिरालाल मेहता यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. चिपळूण रेल्वे स्टेशनवरुन दररोज २२१२ प्रवासी प्रवास करतात. यातील १७१८ प्रवासी विनाआरक्षित, तर ४९४ प्रवासी आरक्षण घेऊन प्रवास करतात. प्रवाशांची संख्या बघून ४० गाड्यांना चिपळूण स्टेशनवर थांबा दिलेला आहे. याशिवाय या मार्गावरुन धावणाऱ्या गाड्यांना वेगवेगळ्या स्टेशनवर थांबा देण्यात आलेला आहे. भविष्याचा विचार करता चिपळूण रेल्वे स्टेशनला दिलेल्या गाड्यांची संख्या ही पुरेशी आहे. तसेच चिपळूण - कऱ्हाड रेल्वे मार्ग २०१५-१६च्या रेल्वे अर्थसंकल्पात समाविष्ट आहे. या मार्गाचे विस्तृत सर्व्हेक्षण झाले आहे. हे काम प्रगतीपथावर आहे. रेल्वे सुरू झाल्यापासून कोकणातून कोणतीही नवीन गाडी सुरू झालेली नाही. कोकण रेल्वे मार्गावर गाड्यांना डबे वाढविण्याची मागणीही सध्या अनिवार्य आहे, असे कोकण रेल्वेचे महाप्रबंधक सिध्देश्वर तेलगू यांनी मेहता यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. तेलगू यांच्या पत्रानुसार कोकण रेल्वे मार्गावर नवीन बदल किंवा जादा थांबे, जादा डबे या गोष्टी दुरापास्त आहेत. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रत्नागिरी ते सीएसटी दरम्यान चार नवीन गाड्या मंजूर कराव्यात, अशी मागणी येथील कोकणी जनतेतून करण्यात येत आहे. त्यामध्ये रत्नागिरी-पुणे, रत्नागिरी-वसईरोड, मडगाव-वसईरोड, मडगाव- मुंबई एक्स्प्रेस अशा गाड्या असाव्यात, अशी मागणी मेहता यांनी केली आहे. या नवीन गाड्या सुरु झाल्यास रत्नागिरी जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना किंवा बाहेरुन रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. (प्रतिनिधी)कोकण रेल्वे मार्गावर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नसल्याचे रडगाणे कायम. चिपळूण रेल्वे स्टेशनवरून दररोज करतात २२१२ प्रवासी प्रवास. ४० गाड्यांना चिपळूण रेल्वे स्टेशनवर थांबा.चिपळूण कऱ्हाड रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण त्यादृष्टीने बोलके. गाड्यांची संख्या दाखवण्यात आलेय पुरेशी.
रत्नागिरीपर्यंत ४ नव्या गाड्या हव्यात : मेहता
By admin | Published: June 10, 2015 11:18 PM