सिंधुदुर्गनगरी : सरकारी कामात अडथळा आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी आमदार नीतेश राणे यांच्यासह ४० संशयित आरोपींना मुख्य न्यायदंडाधिकारी आर. व्ही. हुद्दार यांनी सशर्त जामीन मंजूर केला. डंपर चालक-मालक यांच्या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून येथील शासकीय मालमत्तेचे नुकसान व शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी शनिवारी (दि. ५) आमदार नीतेश राणे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, दत्ता सामंत यांच्यासह एकूण ४० आरोपींविरुद्ध भा. दं. वि. कलम १४३, १४७, १४९, ३२३, ३३२, ३५३, ४४८ अन्वये गुन्हा दाखल केला होता. ६ मार्चला यातील काही व त्यानंतर काहीजणांना कणकवली न्यायालयाने १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.१० मार्चला ही मुदत संपल्याने त्यांना ओरोस येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर केली. न्यायालयीन कोठडी मिळताच संबंधित संशयितआरोपींनी वकिलांमार्फत न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज सादर केला. यावरील सुनावणीत सर्व आरोपींना प्रत्येकी ७ हजार रुपयांचा जामीन मंजूर करण्यात आला. तसेच दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत आठजणांच्या ग्रुपने आठवड्यातून एक दिवस ओरोस पोलीस स्टेशनला हजेरी लावणे, साक्षीदारांवर दबाव आणू नये, तपासकामात पोलिसांना मदत करावी आदी अटीही घालण्यात आल्या आहेत. दरम्यान, आमदार नीतेश राणे यांना अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीत सवलत देण्यात आली आहे.जामीन झालेल्यांमध्ये आमदार नीतेश राणे, सतीश सावंत, संग्राम प्रभुगावकर, संतोष कोदे, नजीर शेख, राधाकृष्ण पावसकर, अनिल नाईक, राजेश सावंत, दुर्गाप्रसाद स्वामी, योगेश राऊळ, शोहेब शेख, अनंत मेस्त्री, स्वप्निल मिठबांवकर, प्रदीप मांजरेकर, संतोष धुरी, महेश म्हाडदळकर, रमेश वायंगणकर, संजय पालव, चंदन कांबळी, अक्षय सावंत, मिलिंद मेस्त्री, देवदत्त सामंत, राकेश म्हाडदळकर, रुपेश जाधव, मुकुंद परब, राकेश परब, एकनाथ नाडकर्णी, संतोष नालंग, सिद्धेश परब, पंढरीनाथ हडकर, महेंद्र सांगेलकर, संतोष चव्हाण, हनुमंत बोंद्रे, आनंद भोगले, यशवंत सावंत, सुनील पवार, सुशांत पांगम, अनिल कांदळकर यांना अटक करण्यात आली होती, तर शिवा सोनू परब व संतोष सोमा राऊत यांना रुग्णालयात दाखल केले गेले असल्यामुळे त्यांना गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यापैकी १ ते १० जणांसाठी अॅड. संग्राम देसाई यांच्यासह अॅड. आनंद गवंडे व अॅड. अविनाश परब, ११ ते २३ यांच्यासाठी अॅड. राजेंद्र रावराणे, २४ ते ४० यांच्यासाठी अमोल सामंत यांनी काम पाहिले. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तर सकाळपासूनच न्यायालयाच्या बाहेर काँग्रेस समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.संशयितांच्यावतीने अॅड. संग्राम देसाई, अॅड. राजेंद्र रावराणे, अॅड. अमोल सामंत यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
नीतेश राणे यांच्यासह ४0 जणांना सशर्त जामीन मंजूर
By admin | Published: March 10, 2016 11:28 PM