खेड : कोकणातील पाटबंधारे बांधण्यासाठी नव्याने ४०० कोटी रुपये मंजूर करून घेतल्याचे सांगत दापोली मतदारसंघासाठी २०० कोटी आपण म्ांजूर केले असून, कोकणातील पर्यटनासठी ६५० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली. शिवतेज आरोग्य सेवा संस्था, जामगे यांच्यावतीने जामगे येथे उभारण्यात आलेल्या कोकणातील पहिल्या वहिल्या राष्ट्रीय मुक्त विद्यालयाचे उद्घाटन संस्थेच्या उपाध्यक्षा ज्योती रामदास कदम यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी कदम बोलत होते. येत्या दोन वर्षामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. महिला बालकल्याण योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या महिलांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव सिध्देश कदम यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी, शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या उपाध्यक्षा ज्योती कदम, सचिव योगिता कापडी, सहसचिव सिध्देश कदम, संचालक योगेश कदम, सुप्रसिध्द उद्योजक व संस्थेचे सदस्य हनुमंत जाधव, सभापती अरूण ऊर्फ चंद्रकांत कदम, संस्थेचे खजिनदार काशिराम सकपाळ, योगिता डेंटल मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमांगी पोळ, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शंकर कांगणे, तालुकाप्रमुख राजा बेलोसे, शहरप्रमुख व नगरसेवक संजय मोदी, नगरसेवक प्रेमळ चिखले, माजी नगराध्यक्ष नागेश तोडकरी, विजय जाधव, जामगे येथील छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूलचे प्राचार्य खोत, उपसभापती रवींद्र मोरे, बशीर हमदुले, निकेतन पाटणे, बाळा खेडेकर उपस्थित होते.आतापर्यंत संस्थेचे मातोश्री वृध्दाश्रम, छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल, विविध माध्यमिक विद्यालये, रूग्णवाहिका, योगिता दंत महाविद्यालय आणि दंत रूग्णालय, विविध वैद्यकीय शिबिरे, मोफत चष्मा वितरण आदी धाडसी उपक्रम सुरू करण्यात आले आहेत, तर आता नव्याने केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालयाची मान्यता असलेले राष्ट्रीय मुक्त विद्यालय सुरू करून शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांची नवी भेट कोकणवासीयांना दिली असल्याचे कदमांनी सांगितले. सिंचनाबाबत बोलताना काही दिवसांपूर्वीच आपण सचिवांची बैठक घेतली असून, राज्यपालांकडे तसा प्रस्ताव सादर केल्याचे ते म्हणाले. संस्थेचे खजिनदार काशिराम सकपाळ यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)
कोकण पाटबंधारे धरणांसाठी ४०० कोटी रुपये
By admin | Published: August 09, 2016 11:26 PM